कोणाची तक्रार नसताना अथवा विद्युत वाहिन्या वगैरे कशाला अडथळा येत नसताना विनाकारण केली जात असलेली मंडोळी रोडवरील झाडांची कत्तल आज भाजप युवा नेते किरण जाधव यांनी रोखून झाडे तोडणाऱ्या वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून तंबी दिली. त्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.
थोडक्यात माहिती अशी की, मंडोळी रोडवर आज गुरुवारी सकाळी एक मोठे जुने झाड वन खात्याकडून जमीनदोस्त करण्यात आले.
मंडोळी रोडवरील झाडांची कत्तल केली जात असल्याच्या कांही तक्रारी यापूर्वी आल्या असल्यामुळे आज तोडण्यात आलेल्या झाडाची माहिती मिळताच भाजप युवा नेते किरण जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच झाड तोडणाऱ्यांना कोणाच्या परवानगीने हे काम करत आहात? असा जाब विचारला.
त्यावेळी उपस्थित वनखात्याच्या कर्मचाऱ्याने साहेबांच्या परवानगीने आम्ही झाड तोडत आहोत असे सांगितले. त्यावेळी त्याच्याकडे परवानगी पत्राची विचारना करताच ते आपल्याकडे नसल्याचे त्याने सांगितले. तेंव्हा किरण जाधव यांनी झाडांची कत्तल तात्काळ थांबवण्यास सांगितले. तसेच यापुढे बेळगाव शहरातील कोणतेही झाड तोडण्यापूर्वी आसपासच्या नागरिकांना प्रथम नोटीस देऊन त्यांचे मत जाणून घ्यावे.
नागरिकांची परवानगी असेल अथवा एखाद्या नागरी सुविधाला अडथळा येत असेल तरच झाड तोडण्यात यावे, असे त्या वन कर्मचाऱ्याला बजावले. तसेच माझा हा निरोप तुमच्या साहेबांनाही दे, असे जाधव यांनी सांगितले.
आज सकाळी संबंधित जवळपास 100 वर्षे जुने झाड मोठ्या करवतीने तोडून जमीनदोस्त करण्यात आले. मात्र हे करताना ते झाड रस्त्यावर कोसळल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. तसेच किरण जाधव आणि भाजप कार्यकर्ते मंडोळी रोडवर दाखल होऊन वृक्षतोड रोखून जाब विचारत असताना बघ्यांची गर्दी झाली होती. या प्रकाराची माहिती मिळताच टिळकवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी झाडांची कत्तल थांबवण्याबरोबरच किरण जाधव यांच्या पुढाकाराने सदर वृक्षतोडीच्या विरोधात नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्याची मोहीम देखील उघडण्यात आली होती. या पद्धतीने किरण जाधव यांनी झाडांची कत्तल थांबविल्याबद्दल नागरिकात विशेष करून पर्यावरण प्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, मंडोळी रोडवरील जुन्या झाडाची कत्तल करण्यात आल्यामुळे सोशल मीडियावर देखील तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. व्हॅक्सिन डेपो येथील एम्फीथीयटर आतून बाहेरून लोकांना दिसावे, आपण केलेला विकास कळावा यासाठी अधिकृतपणे झाड तोडण्यात आले आहे. पोलिसांच्या मते त्या झाडामुळे अपघात घडत होते. रस्त्याशेजारी गेली 100 वर्षे शांतपणे सावली देत उभ्या असलेल्या झाडामुळे एखादा तरी अपघात झालेला कोणाला आठवतो का? राज्यात बेळगाव प्रदूषणाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे यात आश्चर्य ते काय? आपल्या शहरात झाडं, उद्यानं यांना स्थान नाही. झाडांमुळे त्रास होतो हे फक्त बेळगावतच घडू शकतं.
भविष्यात एक ना एक दिवस आम्हा मानवांना याचे उत्तर द्यावे लागणार आहे. झाडांमुळे आपल्याला काय त्रास होतो बुवा? आपण मानव झाडं आणि निसर्गाला खूप त्रास देत आहोत. स्वार्थी मानव. आम्ही मनुष्य म्हणजेच मोठी समस्या आहोत. थोडे लोक विकासाच्या नावाखाली झाडे तोडतात तर थोडे स्वतःच्या समस्येसाठी झाडे तोडत आहेत वगैरे प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.