कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणूक किमान तीन वर्षे पुढे ढकलून या निवडणुकीवर खर्च केला जाणारा सुमारे 30 ते 40 हजार कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वापरावा अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरु सेना बेळगावने एका निवेदनाद्वारे राष्ट्रपतींकडे केली आहे.
शेतकरी नेते आणि रयत संघ व हसीरु सेना बेळगावचे चिटणीस प्रकाश नायक यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीची निवेदन राष्ट्रपतींकडे धाडण्यासाठी आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली असली तरी देशातील शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत दिली जात नाही.
देशाचा अन्नदाता असूनही आज देखील शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे आर्थिक स्थैर्य आणि आर्थिक सुरक्षा प्राप्त झालेली नाही. याउलट सर्व राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम करत आहेत. यापैकी कोणालाही शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब यांची पर्वा नाही. अशा परिस्थितीत भारतीय निवडणूक आयोग कर्नाटकातील विधानसभा निवडणूक घेऊन भ्रष्टाचाराला एक प्रकारे प्रोत्साहन देणार आहे. तसे घडू नये यासाठी कर्नाटकातील निवडणूक किमान 3 वर्षे पुढे ढकलावी. त्यामुळे कर्नाटकातील राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाराला थोडाफार आळा बसेल.
तसेच या निवडणुकीवर जे 30 -40 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, त्या निधीचा विनियोग शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी करावा. हा निधी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या कर्जासाठी त्यांना आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षा प्राप्त करून देण्यासाठी खर्च करावा, अशा आशयाचा तपशील राष्ट्रपतींच्या नावे धाडण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना प्रकाश नायक यांनी कर्नाटकातील सत्ताधारी भाजप सरकारवर टीका केली. अलीकडे बेळगावात झालेले हिवाळी अधिवेशन जनतेच्या कल्याणासाठी नाही तर राजकीय नेते व लोकप्रतिनिधींच्या चैनीसाठी होते असा आरोप करून भाजप काय किंवा काँग्रेस काय या पक्षांनी जनतेला फक्त त्रास देण्याची काम केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमुळे कोट्यावधी रुपये खर्च होण्याबरोबरच भ्रष्टाचारालाही प्रोत्साहन मिळणार आहे. या भ्रष्टाचाराची जबाबदारी भारतीय निवडणूक आयोग घेणार असेल तर त्यांनी खुशाल निवडणुका घ्याव्यात. भ्रष्टाचार रोखण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक किमान 3 वर्षे पुढे ढकलावी आणि या निवडणुक खर्चासाठीचे 30 -40 हजार कोटी शेतकऱ्यांच्या हितासाठी खर्च करावेत, अशी आमची मागणी आहे असे नायक यांनी सांगितले.
याप्रसंगी राजू मरवे, अनिल अनगोळकर, भैरू कंग्राळकर, शाम बसरीकट्टी, सुभाष चौगुले, गोपाळ सोमनाचे, तानाजी हलगेकर, भोमेश बिर्जे, परशुराम सनदी, मनोहर कंग्राळकर आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. उपरोक्त निवेदनाच्या प्रती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान, कर्नाटकचे राज्यपाल आणि देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्त यांना धाडण्यात आले आहेत.