Friday, November 15, 2024

/

‘कमळा’च्या गुलदस्त्यात संधी कुणाला?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरु झाले असून बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने अद्याप उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत. बेळगाव जिल्ह्यातील एकूण १८ मतदार संघातील उमेदवारीसाठी असंख्य इच्छुकांनी उमेदवारीसाठी हायकमांडकडे अर्ज सादर केले असून उमेदवारीची माल कुणाच्या गळ्यात पडणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कर्नाटक राज्याच्या राजकारणातील दबदबा असलेल्या नेत्यांपैकी एक म्हणजे माजी मंत्री, आमदार रमेश जारकीहोळी! गेल्या कित्येक महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्ताराकडे आस लावून बसलेले रमेश जारकीहोळी आणि यांच्यासह अनेक मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या नेतेमंडळींनी दिल्लीवाऱ्या केल्या, हायकमांडकडे साकडे घातले. मात्र शेवटी कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तार बारगळला. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने नाराजीसत्र सुरु झाले. रमेश जारकीहोळी यांच्यासह आमदार श्रीमंत पाटील आणि महेश कुमठळ्ळी यांनाही मंत्रिपद देण्यासंदर्भात जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र अखेरीस मंत्रिमंडळ विस्तार बारगळलाच.

अलीकडेच विद्यमान लोकप्रतिनिधींना आगामी निवडणुकीत संधी द्यावी कि नाही याबाबत भाजपने निर्णय जाहीर केला. यामुळे विद्यमान लोकप्रतिनिधींना उमेदवारी दिली जाणार कि नाही? याबाबतदेखील चर्चा सुरु आहे. सौंदत्तीचे आमदार दिवंगत आनंद मामनी आणि हुक्केरीचे आमदार दिवंगत उमेश कत्ती यांच्या निधनानंतर या मतदार संघात कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल? राज्याचे सत्ताकारण लक्षात घेता रमेश जारकीहोळी, श्रीमंत पाटील, महेश कुमठळ्ळी यांच्या उमेदवारीबाबत हायकमांडला सकारात्मक निर्णय घ्यावाच लागणार आहे. परंतु जिल्ह्यातील १८ पैकी उर्वरित मतदार संघामध्ये देखील विद्यमान आमदारांना संधी दिली जाईल कि नाही? याबाबत संभ्रम आहे.

भाजप हायकमांडच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकीत या निर्णयावरूनच निवडणूक लढविण्यात आली.त्यामुळे गुजरातच्या धर्तीवर कर्नाटकातदेखील हीच संकल्पना राबविली जाईल का? याची धास्ती नेत्यांना लागली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून तयारी करणाऱ्या ईच्छुकांसाठी हि बाब सकारात्मक असली तरी पुन्हा एकदा आपले नशीब आजमावू पाहणाऱ्या विद्यमान नेत्यांसाठी हि बाब धास्तावणारीच ठरत आहे. जिल्ह्यात भाजप वगळता जवळपास इतर पक्षांनी उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र इच्छुकांची यादी पाहता, बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून होत असलेला विलंब यामुळे भाजप उमेदवारी जाहीर करण्यात मागे पडला असल्याचे चित्र आहे.

भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘एक तीर दो निशाण’ अशा पद्धतीचा बेळगाव दौरा पार पडला. मात्र अजूनही भाजपमधील अंतर्गत कुरघोडी सुरूच असून गटबाजीला ऊत आल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगत आहे. बेळगाव जिल्ह्यातील १८ मतदार संघापैकी महत्वाच्या असणाऱ्या बेळगाव उत्तर, दक्षिण, खानापूर आणि ग्रामीण मतदार संघात अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज सादर केले असून यामध्ये बहुतांशी दोन विविध गटातील उमेदवारांचाच अधिक भरणा आहे.

त्यामुळे बेळगावमधील या मतदार संघांसाठी उमेदवार निवडणे हा हायकमांडसमोरदेखील पेच आहे. सदर मतदारसंघात उमेदवारी मिळविण्यासाठी दोन्ही गटातील नेतेमंडळी हायकमांडभोवती परस्पर पिंगा घालत असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असून निवडणुकीतील विजयापेक्षा उमेदवारीसाठी भाजपमध्ये जोरदार बॅटिंग सुरु असल्याचे चित्र आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.