बेळगाव लाईव्ह विशेष : गेली ६६ वर्षे अनेक अत्याचार सहन करून, हुतात्म्यांचे रक्त सांडून तळमळीने धगधगत सुरु ठेवलेल्या सीमाप्रश्नी सीमावासीयांची ससेहोलपट सुरु आहे. अशावेळी महाराष्ट्राकडून खंबीर पाठिंब्याची गरज असताना महाराष्ट्रातील नेतेमंडळीच कर्नाटकाची पाठ थोपटण्यात मग्न असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कर्नाटकात येत्या २ महिन्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या सीमाभागात मतांसाठी राजकारण सुरु आहे. सीमाभागातील मराठी मतदारांची संख्या हि लक्षणीय आणि महत्वपूर्ण भूमिका बजाविणारी आहे. यादृष्टीने एरव्ही जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या मराठी जनतेची मते मिळविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचा आटापिटा सुरु आहे. सीमाभागातील मराठी जनतेवर प्रशासनाची अन्याय आणि अत्याचाराची मालिका सुरु असताना तिरकस नजरेनेही न पाहणाऱ्या राजकारण्यांकडून मराठी भाषिकांना खुश करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सीमाभागातील जनतेचे महाराष्ट्रावर असलेले प्रेम लक्षात घेत सध्या महाराष्ट्रातील नेत्यांना आणि मान्यवरांना आमंत्रित करून मराठी भाषिकांवर भूल पाडण्याचे काम सुरु आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे शरद पवार आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना वगळता इतर पक्षामध्ये सीमाप्रश्नाविषयी अनास्था दिसून येत आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षामुळे महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांच्या शब्दाला आणि भूमिकेला इतर नेतेमंडळी कितपत मान देत आहेत? हाही प्रश्न उद्भवत आहे. शिवाय यावरून महाराष्ट्र अद्यापही दिल्लीश्वरांपुढे झुकत आहे, अशी टीकादेखील सीमाभागातून व्यक्त होत आहे. एकंदर हि सर्व परिस्थिती पाहता सीमावासीयांची अवस्था हि एका ‘मुहाजिर‘ प्रमाणे झाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ज्या महाराष्ट्रात सामील होण्यासाठी सीमावासीय तळमळत आहे त्या महाराष्ट्राकडूनच सीमावासीयांना पाठ दाखविण्यात येत आहे. यामुळे महाराष्ट्र सीमावासियांच्या पाठीशी आहे का? असा प्रश्न अगतिकपणे सीमावासीयांकडून उपस्थित केला जात आहे.
येळ्ळूर येथील राजहंसगडाचे राजकारण सध्या चर्चेत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या गडाच्या विकासकामावरून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती अनावरण सोहळ्यावरून दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये आणि नेत्यांमध्ये जुंपली आहे. २ मार्च रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उपस्थितीत झालेल्या शासकीय अनावरण सोहळ्यानंतर ५ मार्च रोजी ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पुन्हा भव्य -दिव्य असा अनावरण सोहळा आयोजित केला. एकाच मूर्तीचे राजकीय स्वार्थापोटी दोनवेळा अनावरण करण्यात आले. हा शिवाजी महाराजांचा आणि शिवभक्तांचा अवमान आहे. परंतु अशा राजकीय स्वार्थाच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील मान्यवर नेतेमंडळी उपस्थिती दर्शवितात, सीमावासीयांचे दुर्दैव आहे.
राजहंसगडावर झालेल्या कार्यक्रमात ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकरांच्या कौतुकाचे गोडवे महाराष्ट्रातील नेत्यांनी गायिले. इतकेच काय तर, सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यासाठी महत्वपूर्व भूमिका बजाविणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे सुपुत्र धीरज देशमुख यांनी कर्नाटकचा उदो उदो करत जय कर्नाटक असा नारा दिला. गेल्या दोन महिन्यांपूर्वी सीमावासियांच्या बाजूने कोगनोळी टोलनाक्यावर आंदोलन करणारे बंटी पाटील, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणारे संभाजी राजे या सर्वांना सीमाप्रश्नाची जाणीव असूनही त्यांनी उपस्थिती दर्शविली.
नुकतेच डॉ. अमोल कोल्हे यांनी बेळगावचा बेळगावी असा केलेला उल्लेख आणि त्यानंतर सीमाभागात व्यक्त झालेला निषेध यानंतर डॉ. कोल्हे यांनी बेळगाव दौरा रद्द करून आपली चूक सुधारली. या साऱ्या घटनाक्रमानंतर सीमाप्रश्नाचा लढा पुढे नेता येत नसेल तर तो आणखी मागे ओढून सीमावासियांच्या जखमेवर मीठ चोळू नये, अशी प्रतिक्रिया सीमावासीयांनी व्यक्त केली. शिवाय ज्या विधानसभा निवणुकीसाठी हा सारा खटाटोप सीमाभागात भाजप आणि काँग्रेस नेत्यांनी केला त्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि भाजप कोणती भूमिका घेईल? याकडे सीमावासीयांची नजर खिळून आहे.
सीमाभागात आणि कर्नाटकात अनेकवेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होतो. यावेळी मूग गिळून गप्प बसणाऱ्या राजकारण्यांना निवडणुकीच्या तोंडावरच शिवाजी महाराजांचा आणि मराठी भाषिकांचा पुळका कसा येतो? असा प्रश्न सीमावासीय जनता उपस्थित करत आहे. महाराष्ट्रात जाण्यासाठी सीमावासीयांची होणारी ससेहोलपट महाराष्ट्रातील प्रत्येक नेतेमंडळींना माहीत आहे. परंतु हि परिस्थिती माहित असूनदेखील महाराष्ट्रातील नेतेमंडळींकडून सीमाभागाबाबत अनास्था दिसून येत आहे.
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सीमाभागातील नेतेमंडळी महाराष्ट्रातील नेत्यांचा वापर करत आहेत. मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका लक्षात घेऊन महाराष्ट्रातील नेतेमंडळींनी अशा कार्यक्रमासाठी हजेरी लावणे कितपत योग्य आहे? असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. हि सर्व परिस्थिती लक्षात घेता आता सीमावासीयांनीच आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.