या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गाजलेल्या चन्नगिरी (जि. दावणगिरी) मतदार संघाचे भाजपचे आमदार के. माडाळ वीरुपाक्षप्पा यांच्या लाचखोरीच्या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. या प्रकरणात आमदार वीरूपाक्षप्पा यांना अटकपूर्व सशर्त जामीन मिळाला असला तरी त्यांच्याविरुद्ध पुरावे उपलब्ध झाल्यामुळे उच्च न्यायालयाने त्यांचा तो जामीन रद्द केला असून आमदार के. माडाळ वीरुपाक्षप्पा यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की या महिन्याच्या प्रारंभी केएसडीएलचे माजी अध्यक्ष आणि चन्नगिरी (जि. दावणगिरी) मतदार संघाचे भाजपचे आमदार के. माडाळ वीरुपाक्षप्पा यांच्या वतीने 40 लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून तसेच निवासस्थानी आणि कार्यालयात 8 कोटीहून अधिक बेहिशेबी रोकड सापडल्याप्रकरणी वीरुपक्षप्पा व त्यांचा मुलगा माडाळ प्रशांत यांच्यासह सहा जणांविरुद्ध लोकायुक्त पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यावेळी अटकेच्या भीतीने आमदार विरुपाक्षप्पा हे सहा दिवस फरार होते. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या एकल सदस्य खंडपीठाने गेल्या 7 मार्च रोजी आमदार माडाळ वीरुपाक्षप्पा यांना अटकपूर्व प्रशांत जामीन मंजूर केला होता. जामीन देताना आमदारांना 5 लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि दोन जामीनदार देण्याची अट घालण्यात आली होती.
सदर प्रकरणाची काल सोमवारी बेंगलोर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सदर सुनावणीमध्ये पोलीस चौकशीत आरोपी आमदारांना ताब्यात घेणे लोकायुक्त पोलिसांसाठी गरजेचे आहे. तेंव्हा जरी न्यायालयाने प्राथमिक तपास अहवालात (एफआयआर) कोणत्याही गैरबाबी आढळून न आल्यामुळे त्यांना जोपर्यंत प्रकरणाचा संपूर्ण छडा लागत नाही तोपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला असला तरी आता उपलब्ध झालेल्या पुराव्यांवरून आणि मोहन यांच्या जबानी वरून आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट होतो. तेंव्हा सदर प्रकरणाच्या पुढील तपासासाठी आरोपी आमदारांची लोकायुक्त पोलिसांना गरज आहे हे सुस्पष्ट होते. आरोपीने योग्य प्रकारे तपास अधिकाऱ्यांना सहकार्य केले नसल्यामुळे मंजूर करण्यात आलेला जामीन रद्द करावा असे न्यायालयाला वाटते. या प्रकरणाची सत्यता, वस्तुस्थिती आणि परिस्थिती लक्षात घेऊन आरोपीला पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेणे गरजेचे असल्यामुळे त्याचा 7 मार्च 2023 रोजी मंजूर झालेला अटकपूर्व सशर्त जामीन रद्द करण्यात येत आहे, असे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश के. नटराजन यांनी स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे आता आमदार के. माडाळ वीरुपाक्षप्पा यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.