कर्नाटक लघु उद्योग विकास महामंडळाकडून जिल्ह्यातील देसुर, मांगुर, बोरगाव आणि अथणी येथील औद्योगिक वसाहती मधील भूखंडांचे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विविध प्रवर्गातील नागरिकांना या भूखंडांचे वितरण केले जाणार आहे. यासाठी इच्छुकांनी येत्या 13 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भूखंडांसाठी लघुउद्योग विकास महामंडळाच्या सहाय्यक सरव्यवस्थापकांकडे अर्ज दाखल करावा लागणार आहे. वितरित करण्यात येणार असलेल्या भूखंडांपैकी सर्वाधिक म्हणजे 42 भूखंड हे निपाणी तालुक्यातील मांगुर औद्योगिक वसाहतीतील असून बेळगावपासून नजीक असलेल्या देसूर येथील औद्योगिक वसाहती मधील 10 भूखंडाचे वितरण केले जाणार आहे.
बेळगाव तालुक्यातील देसुर येथील सदर 10 भूखंडांपैकी 9 भूखंड हे सामान्य प्रवर्गासाठी आहेत तर एक भूखंड अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. येथील कांही भूखंडांसाठी प्रति चौरस मीटर 2,600 रुपये तर कांही भूखंडांसाठी रु. 3,355 दर निश्चित केला आहे.
निपाणी तालुक्यातील मांगुर गावातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या 42 भूखंडाचे एकाच वेळी वितरण केले जाणार आहे. हे भूखंड सामान्य प्रवर्ग, अनुसूचित जाती व जमाती, महिला, अल्पसंख्यांक इतर मागास प्रवर्ग, माजी सैनिक व दिव्यांगांसाठी राखीव ठेवले आहेत. मात्र या सर्व भूखंडाचे दर मात्र समान म्हणजे 2,600 रुपये इतका असणार आहे.
बोरगाव येथील 10 भूखंडांपैकी 8 भूखंड सामान्य प्रवर्गासाठी तर उर्वरित 2 भूखंड हे अनुसूचित जाती व जमातीसाठी राखीव आहेत. भूखंडांसाठी अर्ज करताना निर्धारित करण्यात आलेली अनामत रक्कम देखील भरावी लागणार आहे.