Friday, January 10, 2025

/

विमान तुमचं असेल, परंतु अवकाश तिचं आहे… रिचा गोस्वामी

 belgaum

महिला आज संरक्षण दलातील फायटर जेट सारख्या लढाऊ विमानाच्या वैमानिक बनत आहेत. अलीकडे एकूणच एकेकाळी पुरुषांची मक्तेदारी असलेले प्रत्येक क्षेत्र महिला काबीज करू लागल्या आहेत. वैमानिक होण्याबरोबरच आता ‘एअर ट्रॅफिक’ या आणखी एका आव्हानात्मक क्षेत्रात महिलांचे पदार्पण झाले असून त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बेळगाव सांब्रा विमानतळावरील एटीसी(एअर ट्रॅफिक कंट्रोल) मॅनेजर रिचा गोस्वामी या होत.

प्रत्येक क्षेत्रातील महिलांची उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेता आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त नमूद करावेसे वाटते की अत्यंत जोखमीचे काम करणाऱ्या रिचा गोस्वामी यादेखील देशातील कर्तुत्वान महिलांपैकी एक आहेत, ज्या बेळगावच्या सांबरा विमानतळावर एटीसी मॅनेजर अर्थात हवाई वाहतूक नियंत्रण व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये बीटेक. पदवी संपादन करणाऱ्या रिचा गोस्वामी यांनी यापूर्वी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त विमानतळ असलेल्या दिल्ली विमानतळावर काम केले आहे.

दिल्ली विमानतळावर दिवसाकाठी 1500 ते 1600 किंवा ताशी 300 ते 500 विमानांची येजा सुरू असते. विमानाने हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीविताचा प्रश्न असल्यामुळे एटीसी मॅनेजरच्या कामात 100 टक्के एकाग्रता आणि चूक होण्याची शून्य शक्यता आवश्यक असते. हवाई वाहतूक नियंत्रणाचे काम हे अतिशय आव्हानात्मक जोखमीचे असले तरी तितकेच रोमांचक आहे, असे रिचा यांनी स्पष्ट केले.Richa goswamy

एटीसी मॅनेजरच्या कामाची पाळी बदलत असते. त्यामुळे त्यानुसार आपल्या शरीराला आपण सवय लावून घ्यावी लागते. कितीही मानसिक ताण असला तरी हवाई रहदारी नियमनाच्या बाबतीतील निर्णय क्षणार्धात घ्यावे लागतात. त्यामुळे अतिमहनीय व्यक्तींचे आगमन, खराब हवामान, मोठ्या प्रमाणात धुके आणि अतिप्रदूषण अशावेळी एटीसी मॅनेजरचा खरा कस लागतो. त्यामुळे अशा परिस्थितीत अनेक विमाने दुसऱ्या मार्गाने वळवावी लागतात किंवा त्यांना विलंब होतो असे रिचा गोस्वामी यांनी सांगितले.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) माहितीनुसार 31 जानेवारी 2023 पर्यंत देशामध्ये 3692 एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) कार्यरत असून यामध्ये 10 टक्क्याहून कमी महिला एटीसींचा समावेश आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) अर्थात हवाई वाहतूक नियंत्रक ही नोकरी म्हणजे भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे संचलित सरकारी नोकरी आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोलरकडून आपल्या विमानतळ परिसरात अवकाशामध्ये ये-जा करणाऱ्या विमान वाहतुकीचे नियमन केले जाते. विमानतळावर आगमन आणि उड्डाण करणाऱ्या विमानांच्या वैमानिकांना मार्गदर्शन केले जाते. त्याचप्रमाणे दिशा चुकू नये यासाठी अवकाशात प्रवास करणाऱ्या विमानांवर लक्ष ठेवले जाते.

आपण एटीसी आहोत याचा रिचा गोस्वामी यांना आनंद तर आहेच, मात्र त्याहीपेक्षा इतर महिलांना हे आव्हानात्मक काम करण्यास आपण प्रेरणादायी ठरत आहोत याचा त्यांना अधिक आनंद आहे. तेंव्हा जर खराब हवामान अथवा धुक्यामुळे तुमचे विमान ऐनवेळी अन्य मार्गाने वळवण्यात आल्यास प्रसंगवधान राखून क्षणार्धात योग्य निर्णय घेणाऱ्या रिचा गोस्वामी सारख्या एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सचे आभार माना. एकंदर जेंव्हा तुम्ही हवाई प्रवास करत असाल तेंव्हा विमान जरी तुमचे असले तरी ज्या मार्गावरून ते प्रवास करत आहे, त्या अवकाशात रिचा गोस्वामी सारख्या एटीएसचे नियम अंतिम असतात हे विसरू नका.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.