बेळगाव लाईव्ह : मागील ३-४ वर्षात अनेक संकटांनी हाहाकार माजवला. अतिवृष्टी, अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूर परिस्थिती, पुरात अनेकांचे झालेले हाल, नुकसान आणि यानंतर दोन वर्षे कोरोनाचा कहर! या सर्व आपत्कालीन परिस्थितीत बेळगावमधील उणिवा समोर आल्या. दरवर्षी अतिवृष्टीमुळे येणाऱ्या बळ्ळारी नाल्याच्या पुराची ज्वलंत समस्याही यापैकीच एक.
बळ्ळारी नाल्याला येणाऱ्या पुरामुळे दरवर्षी या भागातील हजारो एकर शेती पाण्याखाली येते. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. मात्र बळ्ळारी नाल्याच्या या समस्येवर प्रशासन तोडगा काढण्यात हतबल ठरले आहे.
यंदा वळीव आणि अवकाळी पावसाचे प्रमाण कमी असल्याने बळ्ळारी नाला कोरडा पडला आहे. या नाल्यातील पाणी आटल्याने नाल्यातील गाळ काढण्याची संधी प्रशासनाला मिळाली आहे.
या संधीचा फायदा घेत प्रशासनाने गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात केल्यास यंदाच्या पावसाळ्यात पीक नुकसानीचा फटका टाळता येणे शक्य आहे. दरवर्षी नाल्याला येणाऱ्या पुरामुळे परिसरातील सुमारे अडीच हजार एकर शेती पाण्याखाली जाते. त्यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा दुबार पेरणी करावी लागते.
येळ्ळूर शिवारातून सुरू होणारा नाला पुढे वडगाव, अनगोळ, शहापूर, जुने बेळगावमार्गे बसवण कुडची येथून कणबर्गी व मुचंडीमार्गे सुलधाळ येथे जाऊन मार्कंडेय नदीला मिळतो. दरवेळी या ठिकाणी पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांना नेहमीच नुकसान सोसावे लागत असल्याने येथील उत्पादनाचे प्रमाणही अत्यंत घटले आहे. बसवण कुडची, जुने बेळगाव आणि अनगोळ येथे नाल्यातील गाळ आणि झाडाझुडुपांमुळे राज्य मार्गावरील पुलाखाली ब्लॉकेज निर्माण झाले आहेत. वडगाव, शहापूर शिवारात दरवर्षी शेतकरी पुलाखालील गाळ स्वखर्चाने जेसीबी लावून काढतात, पण इतर ठिकाणी पूल मोठे असल्याने गाळ काढणे शक्य होत नाही. त्यामुळे गाळ आणि पुलाखाली ब्लॉकेजमुळे शेती शिवारात पाणी साचून राहते.
२००७ साली बळ्ळारी नाल्यातील गाळ काढण्यास प्रारंभ करण्यात आला, पण काम निकृष्ट दर्जाचे झाले. काढलेला गाळ नाल्याच्या काठावरच ठेवण्यात आला. त्याची उचल झाली नाही. त्यामुळे २००८ साली पावसाळ्यात पुन्हा गाळ नाल्यात जमा झाला. परिणामी, गाळ काढण्यासाठी खर्च केलेला निधीदेखील पाण्यात गेला.
गेल्या काही वर्षांत बळ्ळारी नाल्यातील गाळ काढण्यासाठी अनुदानाची केवळ घोषणाच केली जात आहे. प्रत्यक्षात मात्र अनुदान मंजूर होत नसल्याचे दिसून येत आहे. बेळगाव शहराचे सांडपाणी वाहून जाण्यासाठी बळ्ळारी नाल्याची निर्मिती करण्यात आली.
मात्र, या नाल्यातील गाळ आणि त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे दरवर्षी पावसाळ्यात नाल्याला पूर येत असून परिसरातील शेती पाण्याखाली जात आहे. दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी यंदा प्रशासनाला नामी संधी चालून आली असून तातडीने गाळ काढण्याचे काम प्रशासनाने सुरु केल्यास यंदाच्या पावसाळ्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, हे नक्की.