पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन घालण्यासाठी खुदाई करण्यात आल्यामुळे येळ्ळूर मेन रोडची पार दुर्दशा झाली असून धूळ व मातीमुळे या रस्त्या शेजारील दुकानदार, व्यवसायिक, हॉटेल चालक वगैरे सर्वांनाच मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच हा रोड युद्धपातळीवर दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
एल अँड टी कंपनीकडून 24 तास पाणीपुरवठा पाईपलाईन घालण्यासाठी येळ्ळूर मेन रोडची खुदाई करून पाईप घालण्यात आले. मात्र पाईपलाईन घातल्यानंतर खोदलेली चर व्यवस्थित बुजवून रस्ता पूर्ववत चांगला करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सदर रस्त्यावर सततची रहदारी असते.
गेल्या सुमारे 3 महिन्यापासून हा रस्ता पूर्ववत सुस्थितीत करण्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी बुजवलेल्या चरीची माती इतस्ततः पसरून या रस्त्या शेजारील घरांसह दुकानदार, व्यवसायिक, हॉटेल चालक आदिंना धूळ -मातीचा त्रास सहन करावा लागत आहे. वाऱ्यासह ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीच्या लोटांमुळे लोकांना कामधंदे करणे अवघड झाले आहे.
तसेच त्यांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. दिवसभरात घरांमध्ये तसेच व्यवसायाच्या ठिकाणी दुकानांमध्ये धुळीचे थर साचत आहेत. तरी लोकप्रतिनिधींसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन खणलेला येळळूर मेन रोड युद्धपातळीवर दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.