शहापूर हिंदवाडी लिंगायत स्मशानभूमीमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह उघड्यावर फेकून देण्यात आल्याची घटना आज सकाळी भाजप नेते किरण जाधव यांच्यामुळे उघडकीस आली.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, आनंदवाडी कुस्ती आखाडा, हिंदू स्पोर्ट्स जलतरण तलावाच्या ठिकाणी भाजप युवा नेते किरण जाधव दररोज पोहणे व चालण्याचा व्यायाम करण्यासाठी जातात. त्यानुसार आज मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे व्यायामासाठी जात असताना जवळच असलेल्या शहापूर हिंदवाडी लिंगायत स्मशानभूमी मधून दुर्गंधी येत असल्याचे त्यांना जाणवले.
कुतूहलापोटी स्मशानभूमीत जाऊन पाहिले असता त्यांना त्या ठिकाणी कपड्यात बांधलेला एका महिलेचा मृतदेह कुणीतरी उघड्यावर टाकून गेल्याचे निदर्शनास आले. तेंव्हा किरण जाधव यांनी लागलीच टिळकवाडी पोलिसांसह महापालिकेला याबाबतची माहिती दिली. सदर माहिती मिळताच टिळकवाडी पोलिसांनी लिंगायत स्मशानभूमी दाखल होऊन त्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. तसेच तो शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे.
लिंगायत स्मशानभूमी महिलेचा मृतदेह उघड्यावर फेकून देण्याचा प्रकार सध्या चर्चेचा विषय झाला असून संबंधित महिलेचा मृत्यू नैसर्गिक झाला की त्यामागे कांही घातपाताचा प्रकार आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.
दरम्यान सदर महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवणे आणि नैसर्गिक मृत्यू आहे की घातपात याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.