विधानसभेची निवडणूक पुढील महिन्यात घोषित होण्याची दाट शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांची यादी तयार करण्याची सूचना पोलीस ठाण्यांना करण्यात आली असून त्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत.
बेळगाव जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय व जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालय हे स्वतंत्रपणे कार्यरत आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृह खात्याच्या सूचनेनुसार पोलीस प्रशासनाकडून सराईत गुन्हेगारांची यादी तयार केली जात आहे. निवडणूक पारदर्शकपणे शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून हे पाऊल उचलले जात आहे.
राज्यात मार्च अखेर विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्याची पूर्वतयारी ही सुरू झाली असून त्या अनुषंगाने कांही प्रशासकीय अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अद्यापही काहीजणांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे
निवडणुकीच्या निमित्ताने दरवेळी सराईत आणि अट्टल गुन्हेगारांची यादी तयार केली जाते. खून, दरोडे, मारामारी, धमकावणे, भाषिक तेढ, जातीय दंगल किंवा मतदारांना धमकावणे या प्रकारांमध्ये गुंतलेल्यांचा अहवाल तयार करून यादी बनवली जाते.
तसेच संबंधित गुंडांची ओळख परेडही घेतली जाते. हे काम आता पोलीस प्रशासनाने हाती घेतले असून सर्वप्रथम ठाणे निहाय गुंडांचा अहवाल आणि यादी तयार केली जात आहे.