बेळगाव लाईव्ह : शहरात विविध ठिकाणी रहदारी पोलिसांकडून वाहनधारकांची अडवणूक करून कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. याचदरम्यान आज उद्यमबाग परिसरात एक अशी गोष्ट घडली कि, ज्यामुळे रहदारी पोलिसांना कारवाई करता करता मागे हटावे लागले. परराज्यातील वाहन पाहून रहदारी पोलिसांनी एका वाहनचालकाची अडवणूक केली. रहदारी पोलिसांचा नेहमीचाच असलेला त्रास ओळखून वाहनचालकाने आपली अडवणूक करण्यामागील कारण विचारले. यावेळी वाहनचालकाला कागदपत्रांची विचारपूस करण्यात आली.
योग्य कागदपत्रे सादर करूनही पोलिसांनी वाहनचालकामागे तगादा लावला. परंतु आपली कोणतीही चूक नसल्याने सदर वाहन चालकाने आपली चूक तरी काय आहे? याची विचारणा केली. यावर मोठ्या साहेबांनी कॅमेऱ्यात पाहून अडवणूक करण्याची सूचना केल्याचे कॉन्स्टेबलने सांगितले. मात्र यावेळीही वाहनचालकाने हजारजबाबीपणाने ठामपणे साहेबांना आपण भेटू, आपली चूक दाखवा, सीसीटीव्ही फुटेज दाखवा, चूक सिद्ध करा आणि त्यानंतर आपल्याला दंड ठोठवा असे सांगितले. पोलिसांसमवेत वाहनातून वाहनचालक जात असताना अचानक उद्यमबाग परिसरात वाहन थांबवून पोलिसांनी वाहनचालकाला माघारी जाण्याचे सांगितले, असा प्रकार आज घडला आहे.
शहरातील रहदारी पाहता वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. मात्र रहदारी पोलिसांनी पुन्हा ठिकठिकाणी वाहनांची अडवणूक करण्याचे प्रकार सुरु केले आहेत. कागदपत्रांच्या तपासणीसह वाहनधारकांकडून दंड वसूल करण्यात येत आहे. याचप्रमाणे हेल्मेट घातलेल्या वाहनचालकांनादेखील अडवून त्यांच्याकडून जुना दंड वसूल केला जात आहे. रहदारी पोलिसांकडून सवलतीच्या दरात वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात येत आहे.
शहरात बसवलेल्या सीसीटीव्हीद्वारे निदर्शनात आलेल्या, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून दंडाची आकारणी केली जाते. शहरातील असा सुमारे २६ कोटींचा दंड थकीत आहे. न्यायालयाने जुना दंड भरण्यासाठी ५० टक्के सवलत दिली आहे. अनेक वाहनचालकांनी दंड भरण्यास टाळाटाळ केल्याने आता वाहतूक पोलिसांनी यावर वेगळी शक्कल लढवली आहे.
शहरात ठिकठिकाणी थांबणाऱ्या वाहतूक पोलिसांकडून सर्वच वाहनचालकांची अडवणूक करण्यात येत आहे. याआधी ज्याने हेल्मेट घातले नसेल, त्याला अडवून त्याची कागदपत्रे तपासली जात होती. परंतु, आता हेल्मेटधारकासह सर्वच वाहनांना थांबवले जात आहे. हेल्मेट असले तरी परवाना, आरसी कार्ड, प्रदूषण प्रमाणपत्र तपासले जात आहे. ही सर्व कागदपत्रे असली, तरी या वाहनाचा जुना काही दंड आहे का? हे देखील मोबाईलवर तपासले जात आहे. जर जुना दंड असेल तर यासाठी ५० टक्के सवलत दिली असून तो भरा, असे पोलिस सांगत आहेत. अनेकांकडून असा दंड भरला जात आहे. परंतु, काही ठिकाणी वाहनधारक पोलिसांशी हुज्जत घालत आहेत.
शहरात चन्नम्मा चौक, आरटीओ सर्कल, कोल्हापूर सर्कल, कॉलेज रोड, खानापूर रोड, अशोक सर्कलसह अनेक ठिकाणी पोलिस थांबत असून त्यांच्याकडून जुन्या दंडाची देखील चाचपणी केली जात आहे.