बेळगाव मुख्य जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश मुस्तफा हुसेन यांनी आज मंगळवारी सख्या भावाचा खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून अन्य दोघा भावांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
महेश बबन गवळी व श्याम बबन गवळी अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. सदर प्रकरणाची माहिती अशी की जखमी श्रीकांत बबन गवळी (रा. टिळकवाडी) आणि संशयित आरोपी महेश गवळी व श्याम गवळी (दोघे रा. टिळकवाडी) बेळगाव यांचे वडिलोपार्जित घर टिळकवाडी मध्येच असून त्या घरासाठी त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती.
गेल्या 5 जून 2020 रोजी श्रीकांत गवळी आपल्या म्हशींना चरण्यासाठी व्हॅक्सीन डेपो टिळकवाडी येथे घेऊन गेला होता. त्यावेळी तेथे असलेल्या महेश व श्याम यांनी त्याच्याशी वाद उकरून काढून भांडण केले. या भांडणाचे पर्यवसान श्रीकांत याला लोखंडी लांग व काठीने मारहाण करून गंभीर जखमी करण्यामध्ये झाले. त्यानंतर श्रीकांतची पत्नी दीपा हिने महेश गवळी व श्याम गवळी यांच्या विरोधात टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली होती.
टिळकवाडी पोलिसांनी आरोपींवर भा.द.वि. कलम 307, 504, 506 सह कलम 34 अन्वये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र न्यायालयाने आज दोन्ही आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींच्यावतीने ॲड. प्रताप यादव, ॲड. हेमराज बेंचन्नावर आणि ॲड. स्वप्निल नाईक यांनी काम पाहिले.