बेळगाव लाईव्ह : . ६ फेब्रुवारी रोजी महापौर निवडणूक झाल्यावर लागलीच पालिकेकडून स्थायी समिती निवडणुकीचा प्रस्ताव प्रादेशिक आयुक्तांकडे पाठविला जाईल अशी चर्चा होती मात्र, महापौर-उपमहापौर निवडणूक होऊन आठवडा उलटला तरी स्थायी समिती निवडणूक घेण्याचा प्रस्ताव महापालिकेने अद्याप पाठविला नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
पालिकेतील ५८ नगरसेवकांपैकी ३ नगरसेवक वगळता सर्व नगरसेवक नवखे आहेत. त्यामुळे स्थायी समिती बैठकीत अधिकाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे. स्थायी समिती निवडणूक प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखालीच होते. ही निवडणूक घेण्याचा प्रस्ताव महापालिकेकडून प्रादेशिक आयुक्तांना पाठविला जातो. मात्र पालिकेच्या कौन्सिल विभागाकडे याबाबत विचारणा असता स्थायी समिती निवडणूक घेण्याबाबतचा प्रस्ताव अद्याप पाठविला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
महापालिकेत चार स्थायी समित्या असतात. त्या चारही स्थायी समित्या महत्त्वाच्या असतात. अनेक महत्त्वाचे निर्णय त्या समित्यांकडून घेतले जातात. महापालिकेच्या जमा-खर्चाला मंजुरी स्थायी समितीकडूनच घ्यावी लागते. त्यामुळेच प्रत्येक स्थायी समितीची महिन्यातून एकदा बैठक घेतली जाते. शिवाय महापौर-उपमहापौर निवडणूकीतील नाराज नगरसेवकांना स्थायी समिती अध्यक्षपद देऊन त्यांची नाराजी दूर केली जाते. २०१० पर्यंत महापौर-उपमहापौर निवडणुकीच्या दिवशीच स्थायी समिती निवडणूक घेतली जात होती. पण २०११ पासून ही जबाबदारी प्रादेशिक आयुक्तांकडे देण्यात आली. तेंव्हापासून महापौर निवडणूक झाल्यानंतर आठवडाभरात स्थायी समिती निवडणूक घेतली जाते पण यावेळी तसे झालेले नाही. महानगर पालिकेमध्ये भाजपाला संपूर्ण बहुमत असल्याने निवडणुकीत स्थायी समित्यांवरही भाजपचेच वर्चस्व राहणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
प्रशासन उपायुक्त भाग्यश्री हुग्गी या सध्या कौन्सिल सेक्रेटरी या महत्वाच्या पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे हुग्गी यांच्या सूचनेनंतरच कौन्सिल विभागाकडून प्रादेशिक आयुक्तांना प्रस्ताव पाठविला जाणार आहे, पण हुग्गी यांच्याकडून अद्याप कौन्सिल विभागाला यासंदर्भात सूचना दिली नसल्याची माहिती मिळाली आहे.