राज्यात उद्या रविवारी शासकीय शिवजयंती साजरी केली जाणार असल्यामुळे ‘हर घर भगवा’ या नाऱ्याला अनुसरून प्रत्येक मराठी माणसासह समस्त हिंदूंनी आपापल्या घरावर भगवा ध्वज लावावा, असे श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केलेल्या आवाहनाला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून घराघरांवर भगवे ध्वज डौलाने फडकण्यास सुरुवात झाली आहे.
श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी शासकीय शिवजयंती निमित्त रविवार दि. 19 फेब्रुवारी रोजी शहरातील मराठी माणसांसह प्रत्येक हिंदूने आपल्या घरांवर भगवा ध्वज फडकवावा, असे आवाहन नुकतेच केले होते.
या आवाहनाला सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत असून त्या अनुषंगाने स्वतः श्रीराम सेना हिंदुस्तानचे कार्यकर्ते जोरदार तयारीला लागले आहेत. या कार्यकर्त्यांना स्थानिक युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांचे उस्फूर्त सहकार्य लाभत आहे. ही सर्व युवा कार्यकर्त्यांची फौज आपापल्या भागातील गल्लोगल्लीमध्ये घराघरांवर भगवे फडकविण्यात व्यस्त झाल्याचे पहावयास मिळत आहे. एका सामाजिक सेवाभावी संघटनेने तर बेळगाव शहरात सुमारे 10 हजार भगव्या ध्वजांचे वाटप करून शासकीय शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले आहे.
बेळगाव शहरासह अनगोळ, भवानीनगर, चन्नम्मानगर, वडगाव, शहापूर, येळ्ळूर मजगाव, पिरनवाडी, खादरवाडी आदी बेळगाव दक्षिणेकडील सर्वत्र त्या -त्या भागातील श्रीराम सेना हिंदुस्तान आणि स्थानिक युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घराघरांसह प्रत्येक गल्लीत भगवे ध्वज उभारण्यास सुरुवात केली आहे.
या पद्धतीने एकंदरच उद्या शासकीय शिवजयंती दिवशी सर्वत्र भगवे ध्वज डौलाने फडकविण्याच्या जिद्दीने सर्व कार्यकर्ते कामाला लागल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण शहर भगवमय होण्यास सुरुवात झाली आहे.