बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना बरोबरीची टक्कर देण्यासाठी भाजप हाय कमांड सध्या भाजपच्या निपाणी मतदार संघाच्या आमदार व मंत्री शशिकला जोल्ले यांना बेळगाव ग्रामीण मतदार संघातून उमेदवारी देण्याचा विचार करत आहे. यासंदर्भात प्रसार माध्यमांनी शशिकला जोल्ले यांना छेडले असता त्यांनी ते नाकारले नसले तरी ‘नो कॉमेंट्स’ असे म्हणून अधिक बोलणे टाळले.
प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी मंत्री शशिकला जोल्ले यांना आपल्याला बेळगाव ग्रामीण मतदार संघातून भाजपची उमेदवारी देण्याचा विचार सुरू आहे हे खरे आहे का? असा प्रश्न केला. त्यावेळी ‘तसे तुमच्या कानावर आले असले तरी माझ्या कानावर अद्याप तसे काही आलेले नाही’, असे जोल्ले यांनी सांगितले.
जर पक्षाने आपल्याला आग्रह केला तर आपण बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून निवडणुकीस उभे राहणार का? या पत्रकारांच्या पुढल्या प्रश्नावर उगाच माझी चेष्टा करू नका असे म्हणून ‘नो कॉमेंट्स’ असे उत्तर मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव ग्रामीण मतदार संघातील भाजप उमेदवार कोण असणार याबाबतची उत्सुकता सध्या कमालीची ताणली गेली आहे. माजी आमदार संजय पाटील हे या मतदारसंघातून पुन्हा आपल्याला भाजपचे तिकीट मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत.
त्याचबरोबर माजी मंत्री रमेश जारकीहोळी हे देखील या मतदार संघातून उमेदवारी मिळविण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करत आहेत. या खेरीज रमेश जारकीहोळी बेळगाव ग्रामीण मतदार संघातून मराठा समाजाला भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा देखील आहे.
त्यामुळे माजी आमदार संजय पाटील यांचे समर्थकांनी लवकरच रमेश जारकीहोळी यांची भेट घेऊन त्यांनी संजय पाटील यांना भाजपच्या उमेदवारीसाठी पाठिंबा द्यावा यासाठी गळ घालण्याची तयारी चालविली असल्याचे समजते.