बेळगाव लाईव्ह : महानगर पालिका निवडणूक राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर जरी झाली असली तरी बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर – उपमहापौरपदी पुन्हा मराठी भाषिकांचेच वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. सोमवार (दि. ६) रोजी पार पडलेल्या महापौर – उपमहापौर निवडणुकीत महापौर पदी भाजपच्या शोभा सोमनाचे आणि उपमहापौर पदी रेश्मा पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
बेळगाव महापौर – उपमहापौर पदावर मराठा समाजातील दोन नगरसेविकांची निवड करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कन्नड संघटनांकडून कन्नड भाषिकांना उमेदवारी देण्यासंदर्भात भाजप नेत्यांवर दबाव घालण्यात येत होता. मात्र कन्नड संघटनांच्या दबावाला झुगारून भाजप नेत्यांनी दोन्ही मराठा समाजातील उमेदवारांना प्राधान्य देत मनपावर पुन्हा मराठीचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यामुळे कन्नडिगांचा हिरमोड झाला आहे.
गेल्या ३० वर्षांपासून मनपावर मराठी भाषिकांचीच निर्विवाद सत्ता होती. मात्र या निवडणुकीत समितीचे तीन नगरसेवक जरी मनपावर निवडून आले असले आणि भाजपचे पक्षीय राजकारण असले तरीही महापौर-उपमहापौर पदावर मराठी भाषिकांचीच निवड झाली आहे. यामुळे मराठी भाषिकांचे प्राबल्य पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
आगामी विधानसभा निवडणूक दृष्टीक्षेपात ठेवून उत्तर विधानसभा मतदार संघातील उपमहापौर आणि दक्षिण विधानसभा मतदार संघातील महापौर अशी भाजपच्या कोअर कमिटीने निवड केली आहे. मराठी वोट बँकेकडे लक्ष ठेवून दोन्ही पदे मराठी भाषिकांना देण्यात आली आहेत तर लिंगायत समाजाचे महांतेश नगर येथील प्रभागाचे नगरसेवक राजशेखर डोणी यांना सत्तारूढ गटनेते पद देण्यात आले आहे. भाजपचे एम. बी. जिरली यांनी घोषणा केली.
तीन वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून अधिकृत निवड होणार आहे.