राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रस्तावित बेळगाव रिंग रोडला तीव्र विरोध दर्शवून तालुक्यातील 32 गावांमधील 800 हून अधिक शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदविले आहेत. या शेतकऱ्यांना नोटीसा बजावून त्यांच्या आक्षेपावर सुनावणी होऊन त्यांची बाजू ऐकून घेतली जात आहे. त्यानुसार आज शनिवारी प्रांताधिकाऱ्यांसमोर मुचंडी येथील 48 शेतकऱ्यांच्या आक्षेपांवर सुनावणी झाली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रस्तावित रिंगरोडला विरोध करून रिंगरोडचा प्रस्ताव रद्द करण्याचा विडा शेतकऱ्यांनी उचलला असून सदर प्रस्ताव हाणून पाडण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. रस्त्यावरच्या लढाईबरोबरच न्यायालयीन लढाईसाठी देखील शेतकरी सज्ज होत असून रिंगरोडविरोधात उचगाव येथील शेतकऱ्यांनी लेखी आक्षेप नोंदविले आहेत.
बेळगाव तालुक्यातील 32 गावांतील सुपीक जमिनीतून रिंगरोड घालण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. यासाठी शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली असून शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या आक्षेपांवर सुनावणी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात बाची, वाघवडे येथील शेतकऱ्यांनी आक्षेप दाखल केले असून आक्षेप सुनावणीसाठी अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने म. ए. समितीच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांना खडसावून जाब विचारल्यानंतर अधिकाऱ्यांकडून नियमित सुनावणी सुरू झाली आहे.
प्रांताधिकार्यांसमोर काल शुक्रवारी उचगाव येथील शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या आक्षेपांवर सुनावणी झाल्यानंतर आज शनिवारी मुचंडी येथील 48 शेतकऱ्यांच्या आक्षेपांवर सुनावणी झाली. यावेळी संबंधित शेतकऱ्यांनी आपली मते मांडली.
सुनावणी प्रसंगी शेतकऱ्यांचे वकील ॲड. सुधीर चव्हाण, ॲड. शाम पाटील, ॲड. एम. जी. पाटील, ॲड. महेश मोरे व ॲड. सडेकर माजी महापौर शिवाजी सुंठकर आर आय पाटील हे उपस्थित होते. दरम्यान, गुरुवारी बिजगर्णी, नावगे परिसरातील शेतकऱ्यांच्या आक्षेपावर सुनावणी झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्या शिवबसवनगर येथील कार्यालयात सदर सुनावणी होत आहे.