आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोमवार दि. 27 फेब्रुवारी रोजी बेळगाव दौऱ्यावर येत असून त्या अनुषंगाने प्रशासन पर्यायाने राज्यातील भाजप सरकारकडून आवश्यक ती सर्व जय्यत तयारी करण्यात आली आहे. भगवे ध्वज लावून पंतप्रधानांच्या रोड शोच्या मार्गासह संपूर्ण शहर भगवेमय करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी उद्या सोमवारी बेळगावच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या अनुषंगाने त्यांच्या स्वागतासह आवश्यक सर्व तयारी करण्यात येत असून पंतप्रधानांचा संचार असणाऱ्या मार्गावरील वाहतूक ठीकठिकाणी अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या मार्गावर त्यांच्या स्वागतासाठी ठराविक अंतरावर पक्ष चिन्ह असलेले भगवे ध्वज फडकविण्यात आले आहेत. तसेच शहरांमध्ये सर्वत्र भगवे ध्वज लावून रोड शोच्या मार्गासह संपूर्ण शहर भगवमय करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या बेळगाव दौऱ्याला उद्या दुपारी 2 वाजता प्रारंभ होणार असून अलारवाड क्रॉस येथील मालिनी शेतीच्या ठिकाणी जाहीर सभेने त्यांच्या दौऱ्याची सांगता होणार आहे. जाहीर सभेसाठी मालिनी सिटी येथील माळरान शेत जमीनीचे सपाटीकरण करून त्या ठिकाणी मोठा शामियाना उभारण्यात आला आहे. तसेच जवळच हेलिपॅडची निर्मितीही करण्यात आली आहे.
या हेलिपॅडवर सज्ज असलेल्या भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून जाहीर सभा समाप्त होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी सांबरा विमानतळाकडे आणि तेथून विमानाने नवी दिल्लीला रवाना होणार आहेत. प्रारंभी उद्या सोमवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास पंतप्रधानांचे सांबरा विमानतळावर आगमन होण्याची शक्यता असून तेथून हेलिकॉप्टरने त्यांचे रोड शोसाठी एपीएमसीच्या मैदानावर तयार केलेल्या हेलिपॅडवर आगमन होईल. त्या ठिकाणी राजकीय शिष्टाचारानुसार बेळगावचे प्रथम नागरिक महापौर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उपमहापौर वगैरे मान्यवर पंतप्रधानांचे स्वागत करतील. त्यानंतर लागलीच तेथूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो ला सुरुवात होणार आहे. एपीएमसी मैदानापासून सुरू होणारा हा रोडशो अझमनगर, नेहरूनगर, लक्ष्मी कॉम्प्लेक्स, सिव्हिल हॉस्पिटल रोड, राणी चन्नमा सर्कल, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंग खिंड गल्ली, हेमू कलानी चौक, कपिलेश्वर उड्डाणपूल, एसपीएम रोड, छत्रपती शिवाजी उद्यानापासून डावीकडे ओल्ड पी. बी. रोड मार्गे थेट मालिनी सिटी जाहीर सभेच्या ठिकाणी समाप्त होणार आहे. रोडशोच्या संपूर्ण मार्गाचे बॅरिकेडिंग करण्यात आले असून ठीक ठिकाणी टेबोलाईज चित्ररथ थांबविण्यात येणार आहेत या चित्ररथांच्या माध्यमातून कर्नाटकसह देशातील विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न स्थानिक भाजपा करणार आहे.
सदर रोड शोच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक करण्यात आली असून संपूर्ण शहरात बॅरिकेडिंग करण्याबरोबरच मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जाहीर सभेच्या ठिकाणी मोबाईल वगळता हॅन्डबॅग, पाण्याच्या बाटल्या आणि इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. रोडशो आणि जाहीर सभेसाठी शहरासह बेळगाव जिल्ह्यातील लाखो मोदी समर्थक शहरात दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत असून त्या दृष्टीने सर्व ती खबरदारी घेतली जात आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहराचे नेहमीचे वेळापत्रक विस्कळीत होणार असल्यामुळे काही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे, तर कांही शाळा शनिवार प्रमाणे सकाळच्या वेळेत भरविण्यात येणार आहेत. तथापि पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे उद्या सोमवारी संपूर्ण बेळगाव शहर गजबजलेले असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उद्या सोमवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजप राज्य कार्यकारिणीचे सी. टी. रवी यांच्यासह कर्नाटक भाजपचे दिग्गज नेते बेळगावात उपस्थित असणार आहेत.