बेळगाव लाईव्ह : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि आमदार रमेश जारकीहोळी यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. प्रत्येकवेळी, प्रत्येक कार्यक्रमात सातत्याने लक्ष्मी हेब्बाळकर यांना लक्ष्य करून जारकीहोळी टीकास्त्र सोडत असतात.
उभयतांमधील परस्परविरोधी राजकीय संघर्ष सुरु असतानाच लक्ष्मी हेब्बाळकरांसह आता विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्यावरही रमेश जारकीहोळी यांनी टीका केली आहे.
विधान परिषद सदस्य हे केवळ गाडीचे दरवाजे उघडण्यासाठी आणि बॅग पकडण्यासाठी मर्यादित असून अशा छोट्या व्यक्तीसंदर्भात आपण काहीच बोलणार नसल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
येळ्ळूर येथे राजहंसगडावर सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी आले असता प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली आहे. ग्रामीण भागात सरकारी शिष्टाचाराचे उल्लंघन होत असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना दे म्हणाले, गोकाकमध्ये कुणीही न सांगता कुठेही ये-जा करू शकते त्यावेळी शिष्टाचाराचे उल्लंघन होत नाही,
मात्र आज आपण राजहंसगडावर पाहणी दौऱ्यासाठी आलो तर यात शिष्टाचाराचे उल्लंघन कसे होऊ शकते? राजहंसगडावर झालेला विकास हा सरकारी निधीतून झाला आहे. त्यामुळे शिष्टाचारानुसार विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणे आवश्यक असल्याचे जारकीहोळींनी सांगितले.
यावेळी हिरेबागेवाडी तलाव कामकाजात गोलमाल झाल्याप्रकरणी प्रतिक्रिया देताना, यासंदर्भात पुराव्यानिशी आपण भविष्यात प्रतिक्रिया देऊ असे सांगत तलाव घोटाळ्याचे दाखले लवकरच प्रसिद्ध करू असे जारकीहोळींनी सांगितले.