बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या राजकारणातील कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी आणि ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर हे दोन्ही नेते एकाच मंचावर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नेहमीच या ना त्या कारणावरून एकमेकांवर टीकाटिप्पण्या करणाऱ्या दोन्ही नेत्यांचे दर्शन राजहंसगडावरील शिवाजी महाराज मूर्ती लोकार्पण सोहळ्यादरम्यान एकाच मंचावर होईल, असे चित्र दिसत आहे. राजहंसगड किल्ला विकासावरून सुरु असलेल्या राजकारणात रमेश जारकीहोळी यांनी उडी घेत विकासकामांचे उद्घाटन आणि शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे लोकार्पण हे दोन्ही कार्यक्रम सरकारी कार्यक्रम होण्याबद्दलचा मुद्दा उचलून धरला.
हाच मुद्दा लावून धरत अखेरीस राजहंसगडावरील कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. राजहंसगड विकासकामावरून जारकीहोळी यांनी हेब्बाळकरांना दिलेली टक्कर पाहता सदर कार्यक्रम प्रशासकीय पातळीवरच होणार आहे. येत्या २ मार्च रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते राजहंसगडावरील शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे लोकार्पण करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनीही हिरवा कंदील दाखविला आहे.
२ मार्च रोजी लोकार्पण सोहळ्याची तारीख निश्चित करण्यात आली असून प्रशासनानेही या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे. सदर कार्यक्रम हा सरकारी असून कन्नड आणि सांस्कृतिक विभागातून मिळालेल्या ५० लाखांच्या अनुदानातून आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या गडाचा विकास केला असल्याने त्यांनीही ५ मार्च रोजी स्वतंत्र कार्यक्रमाची आखणी केली आहे.
२ मार्च रोजी होणाऱ्या सरकारी कार्यक्रमात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, कन्नड आणि सांस्कृतिक विभागाचे मंत्री सुनीलकुमार, बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्यासह अनेक मान्यवरांचा या कार्यक्रमात सहभाग असेल.
तर ५ मार्च रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांसह महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचा सहभाग असेल. यामुळे सरकारी कार्यक्रमात लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित राहतील का? असाही सवाल उपस्थित होत आहे.
राजहंसगड विकास कामांच्या उदघाटनासंदर्भात शनिवारी बेळगाव ग्रामीण भाजप कार्यालयात भाजप नेत्यांची प्राथमिक बैठक बोलाविण्यात आली असून या बैठकीत राजहंसगडावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासंदर्भात चर्चा होणार आहे. सदर बैठक रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली होणार असून या बैठकीत माजी आमदार संजय पाटील हेदेखील सहभागी होणार आहेत.
आमदार निधीच्या माध्यमातून झालेला विकास, विकासावरून तापलेले राजकारण तसेच या भागाच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि आमदार रमेश जारकीहोळी यांच्यातील अंतर्गत वाद हे पाहता राजहंसगडावरील कार्यक्रमासंदर्भातही राजकारण तापण्याची शक्यता आहे.
शिवाय या भागाच्या आमदार म्हणून लक्ष्मी हेब्बाळकर आणि सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून रमेश जारकीहोळी या दोघांचीही उपस्थिती सरकारी कार्यक्रमात असेल अशीही शक्यता व्यक्त होत असून त्यामुळे कट्टर विरोधक असणारे नेते एकाच मंचावर हजर राहतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.