राज्य सरकारच्या निर्णयानुसारच राजहंस गडावर कार्यक्रम : पालकमंत्री
बेळगाव लाईव्ह : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि आमदार रमेश जारकीहोळी यांच्यातील वैयक्तिक वाद विकोपाला गेले असून याचा परिणाम राजकीय क्षेत्रावरही दिसून येत आहे. सध्या येळ्ळूर येथील राजहंसगडासंदर्भात याचा प्रत्यय येत असून गडाच्या विकासावरून रमेश जारकीहोळी यांचे लक्ष्मी हेब्बाळकरांना कात्रीत अडकवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. या गडाच्या विकासासाठी वापरण्यात आलेला निधी जरी आमदार निधीतून देण्यात आला असला तरी सदर निधी हा सरकारने मंजूर केल्यामुळे विकासकामांचे उद्घाटन सरकारी कार्यक्रमाने झाले पाहिजे, हा अट्टाहास जारकीहोळींनी केला. यानुसार आता गडावरील विकासकामांचे उदघाटन आणि शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे लोकार्पण हे सरकारी कार्यक्रमांतर्गत होणार आहे. यासंदर्भात आज जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी राजहंसगडावर होणारा कार्यक्रम सरकारी निर्णयानुसारच होणार असल्याचे जाहीर केले आहे.
गेल्या काही महिन्यापासून माजी मंत्री आम. रमेश जारकीहोळी आणि काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. त्यातच आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ऐतिहासिक राजहंसगडावर भव्य शिवमुर्ती उभारली आहे. शिवमुर्तीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची आमदार हेबाळकर यांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, रमेश जारकीहोळी यांनी हेब्बाळकरांना शह देण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमापूर्वीच २ मार्च मार्चला राजहंसगडावर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.
या निर्णयावर आज पालकमंत्र्यांनी शिक्कामोर्तब करत, सरकारच्या निर्णयानुसार राजहंसगडावरील कार्यक्रम जाहीर होईल. या कार्यक्रमासाठी सर्वांनाच विश्वासात घेतले जाईल. शिष्टाचारानुसार योग्य पद्धतीने कार्यक्रम होईल असे सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजहंसगड प्रकरणी भाजप आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगण्याची दाट शक्यता आहे.