कोल्हापूर येथून रेल्वेने सहकुटुंब तिरुपतीला जात असलेल्या एका प्रवाशाचे बेळगाव रेल्वे प्लॅटफॉर्मवर पडलेले पैशाचे पाकीट बेळगाव रेल्वे पोलीस वैजनाथ पाटील यांनी त्या प्रवाशाला सुखरूप परत केल्याची घटना आज सोमवारी सायंकाळी घडली. त्यांच्या या प्रामाणिकपणाची रेल्वे स्थानकावर प्रशंसा होत होती.
याबाबतची माहिती अशी की, कोल्हापूरहून कुटुंबासोबत तिरुपतीला जाणाऱ्या राहुल दत्तात्रय पाटील या व्यक्तीचे पैशाचे पाकीट बेळगाव रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पडले होते. हरीप्रिया एक्स्प्रेस रेल्वेने तिरुपतीला जाणारे राहुल पाटील बेळगावला रेल्वे थांबताच पाण्याची बाटली आणण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरले. घाई गडबडीने पाण्याची बाटली आणण्याच्या नादात राहुल पाटील यांना आपले पैशाचे पाकीट खिशातून प्लॅटफॉर्मवर पडल्याचे लक्षात आले नाही.
दरम्यान त्यावेळी प्लॅटफॉर्मवर ड्युटी करणारे रेल्वे पोलिस वैजनाथ पाटील यांना ते पाकीट मिळाले. पाकीट कोणाचे आहे? हे जाणण्यासाठी त्यांनी तपासणी केली असता त्या पाकिटात 5 हजारहून जास्त रोख रक्कम आणि रेल्वे तिकीट असलेले पाहून असल्याचे निदर्शनास आले.
तेंव्हा त्यांनी तात्काळ पाकिटातील आधार कार्ड व मोबाईल नंबर बघून राहुल पाटील यांना फोनवर कळविले आणि त्यांचे पैशाचे पाकीट सुखरूप त्यांच्या स्वाधीन केले. याबद्दल कोल्हापूरच्या राहुल पाटील आणि कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले.
रेल्वे पोलीस वैजनाथ पाटील यांनी दाखविलेल्या या दुर्मिळ प्रामाणिकपणाची रेल्वे स्थानकावरील प्रवाशांमध्ये प्रशंसा होताना दिसत होती.