यंदाची बारावीची परीक्षा पुढील महिन्यात होणार आल्यामुळे शिक्षण खात्याने या परीक्षेची तयारी सुरू केली असून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 42 परीक्षा केंद्रांमध्ये ही परीक्षा होणार आहे. यंदा 25 हजार 390 विद्यार्थी विद्यार्थिनी बारावीची परीक्षा देणार आहेत.
राज्यातील बारावीची परीक्षा येत्या 9 ते 29 मार्च या कालावधीत होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी येत्या एक-दोन दिवसात परीक्षेची प्रवेश पत्रे (हॉल तिकीटं) संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध होणार असून विद्यार्थ्यांना ती डाऊनलोड करून घ्यावी लागणार आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील बेळगाव शहरात बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात यावेळी एकूण 25,390 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. यामध्ये प्रथमच परीक्षेला बसणारे फ्रेश विद्यार्थी 21,465 इतके असून रिपीटर्स 2820 आणि बहिस्थ विद्यार्थी 1105 इतके आहेत. परीक्षा जवळ येत चालली असल्यामुळे सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे विद्यार्थी -विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र शौचालय, स्वच्छ पिण्याचे पाणी यासह वर्ग खोल्यात आवश्यक असलेली डागडुजी करण्याची सूचना पदवीपूर्व शिक्षण खात्याने केली आहे. कोरोना काळात सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केले नव्हते. मात्र यावेळी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे.