बेळगाव लाईव्ह : दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेळगावमधील श्री कपिलेश्वर देवस्थान मध्ये महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. १८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाशिवरात्रीसाठी मंदिर प्रशासनाने आतापासूनच जय्यत तयारी केली असून संपूर्ण मंदिर परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
मंदिराच्या चारही बाजूंनी मंडपाची सोय त्याचप्रमाणे मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने आणि फुलांच्या सजावटीने सजविण्यात आला आहे. महाशिवरात्रीला देवस्थानात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रांगेत उभं राहून दर्शन घेता यावं यासाठी कपिलेश्वर तालवानजीक मंडपाचीही सोय करण्यात आली आहे.
महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी रात्री १२ नंतर पंचामृत अभिषेकला सुरुवात होणार आहे. श्री कपिलेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने बेळगावकरांच्या सुख समृद्धीचा उद्देशाला प्राधान्य देत पहिला अभिषेक विधी पार पडणार आहे. यानंतर पहाटे ५ वाजेपर्यंत पंचामृत अभिषेक सुरु राहणार आहे.
अभिषेक विधी पार पडल्यानंतर रुद्राभिषेक आणि त्यानंतर त्रिकाल पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. त्रिकाल पूजा झाल्यानंतर महाशिवरात्रीची विशेष महाआरती सायंकाळी 8 वाजता करण्यात येणार आहे. याचप्रमाणे सालाबाद प्रमाणे रविवार दि. १९ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
महाप्रसाद वितरित करण्याचे हे २८ वे वर्ष असून महाशिवरात्रीनिमित्त कपिलेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजिलेल्या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्ट समितीने केले आहे.