वाहतूक नियम भंगासंदर्भातील मोठ्या संख्येने प्रलंबित असलेले गुन्हे निकालात काढण्यासाठी एक उदार प्रयत्न करताना कर्नाटक परिवहन खात्याने प्रलंबित चलनांच्या दंड वसुलीत 50 टक्के सूट देण्याची ‘वन टाईम ऑफर’ जाहीर केली असून वाहतूक नियम भंग करणारे जे लोक 11 फेब्रुवारीपर्यंत दंड भरतील त्यांनाच ही ऑफर लागू असणार आहे.
परिवहन खात्याच्या अवर सचिव पुष्पा व्हीएस यांनी शहरातील सर्विलन्स कॅमेऱ्यामध्ये वाहतूक नियमाचे उल्लंघन करताना आढळून आलेल्या ज्या लोकांवर ई -चलनद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्यासाठी हा आदेश जारी केला आहे.
चलनाच्या दंडात सूट देण्याचा निर्णय गेल्या 27 जानेवारी रोजी कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकरणाचे चेअरमन न्यायमूर्ती बी. वीरप्पा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीत वाहतूक नियम भंगासंदर्भात सर्वांना न्याय मिळेल या पद्धतीने लवकरात लवकर पावले उचलून अनुपालन अहवाल देण्याची विनंती परिवहन खात्याला करण्यात आली होती.
त्यानुसार परिवहन खात्याने येत्या 11 फेब्रुवारी पर्यंत चलनाचा दंड भरणाऱ्यांसाठी दंडामध्ये 50 टक्के कपात करण्याची वन टाईम ऑफर जाहीर केली आहे. कर्नाटक परिवहन खात्याच्या दंडात 50 सूट देण्याच्या ऑफरचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी आपला दंड नजीकच्या पोलीस ठाण्यात जाऊन भरावा अथवा कर्नाटक वन पोर्टलच्या माध्यमातून अदा करावा.
एकंदर वाहतूक नियम भंग केलेल्या वाहन चालकांनी आपला वाहतूक दंड 50 टक्के माफ होणाऱ्या या ‘वन टाईम’ ऑफरचा लाभ घेण्याची संधी दवडू नये.