Monday, December 30, 2024

/

स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी नगरसेवकांसमोर आव्हान

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : अखेर महानगरपालिकेवरील प्रशासकीय राजवट संपुष्टात येऊन निवडून आलेल्या नगरसेवकांचा शपथविधी पार पडला असून बेळगाव महानगरपालिकेचे सभागृह अस्तित्वात आले आहे. या निवडणुकीत बेळगाव मनपावर ५८ नगरसेवकांची वर्णी लागली असून यापैकी ५५ नगरसेवकांची मनपा सभागृहाचे कामकाज हे नवखे असणार आहे. नव्याने निवडून प्रथमच मनपाचा कार्यभार नगरसेवक म्हणून हाती घेण्याचा पहिलाच अनुभव असलेल्या नगरसेवकांसमोर स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कस लावावा लागणार आहे. परंतु यादरम्यान कोणत्याही लोकप्रतिनिधींच्या हाताखालचे बाहुले न होता स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्याचे आव्हान विद्यमान नगरसेवकांसमोर आहे.

बेळगाव महापालिकेतील 58 पैकी जवळपास 55 नगरसेवक हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. या नगरसेवकांचा सभागृहातील अनुभव शून्य आहे. सभागृहातील कामकाजाचा अनुभव घेऊन, अधिकाऱ्यांकडून रखडलेली कामे करून घेणे, सातत्याने कामकाजासाठी पाठपुरावा करणे, सभागृहात मुद्दे उपस्थित करणे आणि उपस्थित केलेले मुद्दे सातत्याने वर उचलून धरणे अशा सर्व गोष्टींसाठी नवनिर्वाचित ५५ नगरसेवकांना आता कसरत करावी लागणार आहे.

बेळगाव मधील 58 नगरसेवकांमधील 3 नगरसेवक हे जाणकार आहेत. यामध्ये मुझम्मिल डोणी, रवी धोत्रे यांची सभागृहातील तिसरी वेळ आहे तर अजीम पटवेगार हे दुसऱ्यांदा या सभागृहात उपस्थित असणार आहेत. या तिघांव्यतिरिक्त कोणीही अनुभवी नगरसेवक नसल्याने अनुभवाची कमतरता या नगरसेवकांमध्ये असणार आहे. यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी नगरसेवकांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

एकेकाळी बेळगाव महानगरपालिकेतील नगरसेवक हे अभ्यासू होते. त्यांच्याकडून अनुभव आणि मार्गदर्शन घेऊन अधिकाऱ्यांना विकासकामावरून धारेवर धरणे आणि विविध मुद्द्यांवरून सळो कि पळो करून सोडणे हे त्यांच्या अंगी मुरले होते. माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, नेताजी जाधव, माजी महापौर विजय मोरे, रमेश सोनटक्के, दिनेश नाशिपुडी याचबरोबर मागील काही कालावधीतील कन्नड भाषिक नगरसेवक सक्रिय होते. अशा माजी महापौर-उपमहापौर, नगरसेवकांचे अनुभव आणि मार्गदर्शन घेऊन विद्यमान नगरसेवक आणि महापौर-उपमहापौरांनी कामकाजाचा श्री गणेशा केला तर महानगरपालिकेचा त्यांचा प्रवास नक्कीच सुखकर होईल.

सध्या रखडलेली स्मार्ट सिटीची कामे, बेळगाव शहरातील स्वच्छतेच्या तक्रारी, कचऱ्याच्या विल्हेवाट संदर्भातील अडचणी, कचरा व्यवस्थापनचे वाजलेले तीन तेरा, पाणीटंचाई, रस्ते-गटारी यासारख्या विविध प्रश्नांवर नगरसेवकांना काम करावे लागणार आहे. १९९०, २००४ सालच्या सभागृहातील नगरसेवकांनी सभागृहाच्या बाहेर एकमेकांच्या समन्वयाने प्रत्येक प्रभागात जाऊन भेट देऊन तेथील समस्या जाणून घेत समस्या सोडविलेल्या बेळगावकरांनी पहिले आहे. महानगरपालिका यंत्रणेने काम नाही केले तर स्वतः रस्त्यावर उतरून काम करण्याची धमकही त्या नगरसेवकांमध्ये होती. हीच धमक आणि बेळगावचा कायापालट करण्याची वृत्ती अंगी जोपासून नवनिर्वाचित नगरसेवकांना करावे लागणार आहे आणि सभागृहात आपले अस्तित्व सिद्ध करावे लागणार आहे.New corporator

नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी ‘नगर सेवक प्रशिक्षण’ कार्यशाळेची देखील गरज व्यक्त होत आहे. एकूणच पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांना सभागृहाचे कामकाज नवीन आहे. सभागृहातील कामकाजाचा अंदाज, प्रश्न उपस्थित करणे, अधिकाऱ्यांकडे विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरत रखडलेली कामे पूर्ण करून घेणे या साऱ्या गोष्टी नगरसेवकांना कराव्या लागणार आहेत.

गेल्या चार वर्षापासून प्रशासकीय राजवट मनपा सभागृहात अस्तित्वात असल्याने सध्याचे अधिकारी माजले आहेत. अधिकाऱ्यांवर कुणाचाही वचक नसल्याचे निदर्शनात आले आहे. आता अधिकाऱ्यांवर वचक आणण्यासाठी नगरसेवकांना काम करावे लागणार आहे. यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या हाताखालचे बाहुले न होता आपले स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी नगरसेवकांना झटावे लागणार आहे, विद्यमान नगरसेवकांनी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करून बेळगावच्या नागरिकांमध्ये स्वतंत्र आपला ठसा उमटविणेहि गरजेचे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.