छ. शिवाजी महाराजांच्या जीवावर मतांची भीक मागून आमदार झालेल्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांच्या रिंग रोडच्या विरोधातील आंदोलनासह अन्य एकाही आंदोलनाला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांसह सर्वांनी त्या आमदारांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केले.
मुतगा (ता. जि. बेळगाव) येथे आज सोमवारी सकाळी बेळगाव रिंग रोड च्या विरोधात रास्ता रोको करण्यात आला त्याप्रसंगी कोंडुसकर बोलत होते. बेळगाव शहराच्या रिंग रोडसाठी तालुक्यातील 32 गावांमध्ये सुपीक शेत जमिनींचे भूसंपादन केले जाणार आहे. परिणामी रिंग रोड प्रकल्पाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवून आक्रमक पवित्रा घेतला आहे.
त्या अनुषंगाने आज बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मुतगा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रारंभी समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर आणि शेतकरी नेत्यांच्या हस्ते गावातील शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रस्ता रोको आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. या आंदोलनात माजी आमदार किणेकर यांच्यासह श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, सुनील अष्टेकर, आर. आय. पाटील आदींसह मुतगा येथील शेतकरी आणि शेतकरी कुटुंबातील महिला बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या.
आंदोलना प्रसंगी बोलताना रमाकांत कोंडुसकर यांनी प्रारंभी रिंग रोड प्रकल्प रद्द करून सुपीक शेत जमिनी वाचविण्याद्वारे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते करत असलेल्या प्रयत्नांबद्दल शेतकरी बांधवांतर्फे त्यांना धन्यवाद दिले. आजच्या या आंदोलनात आपल्या माता भगिनी सहभागी झाले आहेत. मात्र शेतकरी आणि छ. शिवाजी महाराजांच्या जीवावर मतांची भीक मागून जे आमदार झाले आहेत त्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांच्या एकाही आंदोलनाला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांसह सर्वांनी त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. कारण हे लोक शिवरायांचे विचार सांगतात मात्र शिवरायांच्या एकाही आदर्शाचे अनुकरण ते करत नाही, असे कोंडुसकर यांनी स्पष्ट केले.
छ. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात शेतकऱ्यांच्या शेतातील गवताच्या पात्यालाही हात लावण्याची कुणाची हिंमत नव्हती. कारण शिवरायांचा तसा आदेश होता. मात्र त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आमदारकी खासदारकी मिळविलेल्यांचे शेतकऱ्यांची काही देणे घेणे राहिलेले नाही. कोरोना काळातही लोकप्रतिनिधी या नात्याने रस्त्यावर उतरून समाजाला आधार देण्याऐवजी ही मंडळी घरात सुरक्षित बसली होती.
मात्र शेतकरी ही एकमेव व्यक्ती होती की जी कोरोना काळातही जीवावर उदार होऊन आमदार खासदार वगैरे सर्वांची तसेच सर्वसामान्य नागरिकांची पोटाची व्यवस्था करण्यासाठी, त्यांना अन्नधान्य देण्यासाठी शेतात राबत होती. अशा शेतकऱ्याला धुळीस मिळवण्याचा डाव राज्य व केंद्र सरकार करत आहे तो आपण संघटितपणे हाणून पाडला पाहिजे, असे मत रमाकांत कोंडुसकर यांनी व्यक्त केले.
पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा एल्गार…एक इंचही भूमी रिंग रोडला देणार नाही.. मुतगा येथे शेतकऱ्यांचा रस्ता रोको|Belgaum Live|https://t.co/QlReuOgAxk pic.twitter.com/izKlok664W
— Belgaumlive (@belgaumlive) February 6, 2023