बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले असून दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या कार्यकाळात सुरु करण्यात आलेल्या नूतनीकरणाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे.
दरम्यान बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली असून बेळगाव रेल्वेस्थानकावरून नवीन रेल्वे मार्ग सुरु करण्याबाबत चर्चा केली.
बेळगाव रेल्वेस्थानकाचे नूतनीकरणाचे कामकाज पूर्णत्वास आले असून लवकरच नूतनीकरण केलेल्या रेल्वेस्थानकाचे उदघाटन देखील होणार आहे.
मात्र बेळगाव रेल्वे स्थानकावरून विविध ठिकाणची रेल्वे सेवा कोलमडली असून खासदार अंगडी यांनी अश्विनी वैष्णव यांच्याकडे बेळगाव ते बेंगळुरू, पंढरपूर, वाराणसी, अयोध्या, मिरज, वास्को, पुणे आणि एर्नाकुलम या मार्गावर नवीन रेल्वे मार्ग सुरु करण्यासंदर्भात चर्चा केली आहे.
खासदार मंगला अंगडी यांनी केलेल्या विनंतीवरून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी कुमार यांनी नवीन मार्ग प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले.