नव्याने विकसित करण्यात आलेल्या बेळगाव रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यासाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी बेळगावला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात आयोजित भव्य रोड शो मध्ये देखील सहभागी होणार आहेत.
रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्याबरोबरच पंतप्रधान मोदी राज्य सरकार आणि पंतप्रधान कार्यालयाची संमती असलेल्या शहरातील विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतील. बेळगावातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो हा अतिशय विराट अविस्मरणीय असा होणार असल्याचे भाजप नेत्यांकडून सांगितले जात आहे. रोड शोसाठी निवडण्यात आलेल्या तीन मार्गांद्वारे कर्नाटक राज्य आणि देशाची संस्कृती व परंपरेचे दर्शन घडविले जाणार आहे. पंतप्रधानांच्या जाहीर सभेसाठी सीपीएड मैदान किंवा अन्य दुसरा पर्याय असू शकतो. बेळगाव रेल्वे स्थानकाचे उद्घाटन देखील या जाहीर सभेच्या ठिकाणीच होण्याची दाट शक्यता आहे.
रोडशो व्यतिरिक्त पंतप्रधान मोदी किसान सन्मान योजना, जलजीवन मिशन आणि हॉस्पिटल्सचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधानांच्या रोडशोची तयारी सध्या हाती घेण्यात आली आहे. दरम्यान आगामी महिन्याभरात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप सरकारने केंद्रातील नेते मंडळींना निमंत्रित करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदींच्या नावावर आपल्याला नक्की मते मिळतील असा विश्वास ही पक्षाने व्यक्त केला आहे.