बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात दोन्ही राज्यातील न्यायमूर्ती उपस्थित राहणार नाहीत, यासाठी विशेष दक्षता घेण्यात येईल, महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठी अतिरिक्त वकिलांची नेमणूक करण्यात येईल आणि सीमा भागातील लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी चंदगड आणि उदगीर येथे कार्यालय सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला दिली.
सीमा प्रश्नासाठी महाराष्ट्र सरकारला जाग यावी यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर आयोजित धरणे आंदोलनात हजारोंच्या संख्येने सीमावासीयांनी सहभाग घेतला होता. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला विधानभवनात चर्चेसाठी बोलविले होते.
यावेळी समितीचे नेते प्रकाश मरगाळे यांनी सीमावासियांच्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिले. यावेळी सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीसाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यात येऊ नये, असे पत्र न्यायालयाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. सीमाप्रश्नाच्या कामकाजासाठी तज्ञ समितीची मासिक बैठक घेण्याचा आणि दर तीन महिन्याला उच्चाधिकार समितीची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठी अतिरिक्त दोन वकील नियुक्त करण्यात येणार आहेत. त्याबाबत उच्च अधिकार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी हमी यावेळी देण्यात आली.
सीमाभागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्राच्या विविध सरकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी चंदगड येथे उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नेमून विशेष कार्यालय सुरू करण्याचा, तसेच उदगीर या ठिकाणीही असे कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी मरगाळे यांनी सीमाभागातील मराठी जनतेला भाषिक अधिकार मिळावेत यासाठी केंद्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या अहवालांवर संसदेत चर्चा घडावी, तशा सूचना सर्व खासदारांना द्याव्यात आणि सर्व पक्षीय शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी अशी मागणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर आपण जातीने लक्ष घालू, अशी ग्वाही दिली.
शिष्टमंडळात ऍड. एम.जी. पाटील, सुनील अष्टेकर, खानापूर तालुका समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, विकास कलघटगी, शंकर बाबली, महेश बिर्जे, रणजीत पाटील, जयराम मिरजकर बेळगाव लाईव्हचे संपादक प्रकाश बेळगोजी, दैनिक पुढारी चे मुख्य बातमीदार जितेंद्र शिंदे आदींचा सहभाग होता. यावेळी सीमासमन्वय मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई, आमदार भरत गोगावले, प्रधान सचिव भूषण गुगरले आदी उपस्थित होते.