बेळगाव लाईव्ह : रविवार दि. १९ फेब्रुवारी रोजी रामलिंग खिंड गल्ली येथील शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत ‘चलो मुंबई’ मोर्चा आणि आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर म. ए. समितीचे दीपक दळवी हे होते.
या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी विविध विषयांवर महत्वपूर्ण मुद्दे मांडून सूचना केल्या. बैठकीच्या प्रारंभी शहर देवस्थान समितीचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश सांगितला.
या बैठकीत प्रामुख्याने २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मोर्चा संदर्भात चर्चा करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मुंबई येथे महाराष्ट्र सरकारच्या नेतेमंडळींची समिती शिष्टमंडळाने नुकतीच भेट घेऊन २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मोर्चा संदर्भात माहिती दिली असून मुंबई भेटीत सरकारच्या नेतेमंडळींशी झालेल्या चर्चेसंदर्भात नेत्यांनी वृत्तांत कथन केले.
मुंबई येथील आंदोलनात सहभागी होणाऱ्या मराठी भाषिकांच्या जेवणाची आणि राहण्याची सोय महाराष्ट्रातील नेतेमंडळी करणार असून या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर आपली नावे समिती कार्यकारिणीकडे नोंदविण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. यावेळी दिवंगत समिती कार्यकर्त्यांना आणि मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी समिती नेते रमाकांत कोंडुसकर, महादेव पाटील, विश्वनाथ सूर्यवंशी, सतीश पाटील, मदन बामणे, सागर पाटील गुणवंत पाटील, गजानन पाटील, अभिजित मजूकर, अमित देसाई, सौ. शिवानी पाटील, आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या चलो मुंबई आंदोलनासंदर्भात याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीने रूपरेषा ठरविण्याबाबत यावेळी आपली मते मांडली.
आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने लवकरात लवकर उमेदवार निश्चित करून प्रचाराला सुरुवात करावी, एकच उमेदवार जाहीर होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत तसेच मतांची विभागणी होणार नाही याकडे समिती नेत्यांनी लक्ष पुरवावे अशा महत्वपूर्ण मागण्यांचे मुद्दे उचलून धरत अनेक कार्यकर्त्यांनी आपले प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच चलो मुंबई मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धारही करण्यात आला.
बैठकीत इतर संघटना आणि पक्षातून आलेल्या मराठी भाषिकांना शहर समितीत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला त्या अनुषंगाने शहर समितीने 200 जणांच्या नवीन कार्यकारिणीची नावे जाहीर करण्यात आली या शिवाय इतर संघटनेतून समितीत सामावून घेण्याचा निर्णय झाला.
अखेर झाली शहर समितीची बैठक..
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर समिती कार्यकर्त्यांनी मांडल्या बैठकीत सूचना pic.twitter.com/gDgMDyeOV7— Belgaumlive (@belgaumlive) February 19, 2023