बेळगाव लाईव्ह : राजहंसगडाच्या विकासकामावरून सध्या जोरदार राजकारण सुरु असून राजहंसगड हा महाराष्ट्र एकीकरण समितीमुळे शाबुत असल्याचे समितीने म्हटले होते. दरम्यान, आज राजहंसगडावर माजी मंत्री आणि विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांच्यासह भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांनी राजहंसगडावर भेट देत तेथे सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी केली. यावेळी माजी आमदार संजय पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
महाराष्ट्र एकीकरण समितीने राजहंसगडासाठी मोलाचे योगदान दिले आहे. एकेकाळी विक्रीसाठी काढण्यात आलेला राजहंसगड महाराष्ट्र एकीकरण समितीमुळे वाचला आहे. आज भलेही या गडावर विकासकामे सुरु आहेत. मात्र हा गड आज अभेद्यपणे उभा आहे तो म. ए. समितीच्या प्रयत्नामुळे.
आज राजहंसगड सीमाभागात ऐतिहासिक वारसा म्हणून जपला गेला, यासाठी आमदार मनोहर किणेकर यांनी विधिमंडळ अधिवेशनात राजहंसगडाची विक्री थांबविण्यासाठी उपस्थित केलेला मुद्दा महत्वाचा ठरतो आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय पाटील म्हणाले, समिती जर हा दावा करत असेल तर त्याचे स्वागतच आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. त्यांच्या कामासाठी कुणीही प्रयत्न करत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. याचप्रमाणे नियोजित उद्घाटन समारंभास महाराष्ट्रातील नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.
यामुळे आपल्याला याचीही कोणती अडचण नसून शिवरायांच्या कोणत्याही चांगल्या कामासाठी कोणताही पक्ष, कोणतेही संघ-समित्या आणि कार्यकर्ते लाखोंच्या संख्येने उपस्थित राहिले, तर यात वावगे काहीच नसल्याचे त्यांनी सांगितले.