भारतीय लष्कराची देशातील सर्वात जुनी रेजिमेंट असलेल्या बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटतर्फे आज शनिवारी 4 फेब्रुवारी रोजी ‘मराठा दिन’ दिमाखात साजरा करण्यात आला.
देशात 1768 मध्ये उदयास आलेली मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट भारतीय लष्कराची सर्वात जुनी रेजिमेंट आहे. या रेजिमेंटसाठी 4 फेब्रुवारी हा दिवस ऐतिहासिक महत्त्व असणारा आहे. या दिवशी 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुलकातील मोगलांनी जप्त केलेले मराठ्यांचे किल्ले पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याची मोहीम उघडली. ज्याची सुरुवात महाराजांनी आजच्या दिवशी 4 फेब्रुवारीला पुण्याजवळील आत्ताच्या सिंहगडावर आणि तत्कालीन कोंढाणा किल्ल्यावर आक्रमण करण्याद्वारे केली.
सेनापती तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी मराठा फौजेने सिंहगड ताब्यात घेतला. त्यानंतर मराठा योध्यांनी मोघलांचे वर्चस्व असणारे सर्व 23 किल्ले काबीज करून त्यांच्यावर पुन्हा मराठ्यांची सत्ता आणली. त्या मराठा योद्ध्यांपासून प्रेरणा घेऊन त्यांचा वारसा जपताना मराठा रेजिमेंट गनिमी काव्यात पारंगत आहे.
शिवकालीन मराठा फौजेचा महान वारसा जपणाऱ्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटला आजतागायत 52 युद्ध सन्मान, 12 थिएटर सन्मान, 2 व्हिक्टोरिया क्रॉससह 28 शौर्य पुरस्कार, 5 अशोक चक्र, 31 परम विशिष्ट सेवा मेडल, 5 महावीर चक्र, 15 कीर्ती चक्र, 44 वीर चक्र, 65 शौर्य चक्र, 421 सेना मेडल आणि 1 अर्जुन पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे.
या रेजिमेंटने क्रीडा क्षेत्रात देखील आपली ताकद दाखविली आहे. मराठा रेजिमेंटच्या क्रीडापटूंनी ऑलम्पिक, विश्व अजिंक्यपद आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी नोंदवत पदकं जिंकली आहेत.
शिवरायांच्या यशस्वी सिंहगड मोहिमेच्या स्मरणार्थ 4 फेब्रुवारी रोजी साजरा केल्या जाणाऱ्या मराठा दिनानिमित्त मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट बेळगावतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिस्तबद्ध संचलनाद्वारे मराठा सेंटर येथील छ. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
शिवरायांप्रमाणेच यावेळी देशाची एकता आणि अखंडतेसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या युद्ध वीरांना देखील संस्मरणीय आदरांजली वाहण्यात आली. या सोहळ्यास मराठा रेजिमेंटचे सर्व वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि जवान उपस्थित होते. मराठा दिनानिमित्त मराठा रेजिमेंटचा सांस्कृतिक वारसा दर्शविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. अखेर रेजिमेंटल बडाखाना होऊन मराठा दिन सोहळ्याची सांगता झाली.