Friday, December 20, 2024

/

मराठी, मराठा आणि छत्रपती हे राजकारणाचा विषय नव्हेत!

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : भाषावार प्रांतरचनेत कर्नाटकात अन्यायाने डांबल्या गेलेल्या बेळगावसह ८६५ खेड्यांचा जीव आजही तीळतीळ तुटतो आहे. कर्नाटकाच्या पाशवी आणि जुलमी अत्याचाराच्या जात्यात भरडल्या जाणाऱ्या सीमावासीयांना आजतागायत कोणी वाली मिळाला नाही.

एरव्ही मराठीची कावीळ असल्याप्रमाणे वागणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांना मराठी जनतेची कधीच कन्हव आली नाही. कानडीकरणाच्या वरवंट्याखाली मराठी जनतेला भरडणाऱ्या प्रशासनाला जाब विचारण्याचे आणि मराठी भाषिकांच्या बाजूने उभं राहून त्यांची बाजू मांडण्याचे सौजन्य कधी आजवर लोकप्रतिनिधींनी दाखविले नाही. उलट याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून मराठी जनतेचा निवडणुकीच्या दरम्यान सोंगट्यांप्रमाणे वापर करणाऱ्या लोकप्रतिनिधींना मराठी जनतेचा पुळका आला आहे.

सध्या कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे वातावरण सुरु आहे. अवघ्या दीड-दोन महिन्याच्या अंतरावर आलेल्या निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधींना आता मराठीची आठवण होऊ लागली आहे. यात नवल असे काहीच नाही. आजवर राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांनी मराठी जनतेच्या भावनांशी ‘मराठी आणि छत्रपती शिवरायांच्या’ मुद्द्यावरून नेहमीच खेळ केला आहे.

बेळगावमधील बहुल मराठी जनतेच्या ‘मराठी वोट बँकेचा’ विचार करून मराठी मतदारांसमोर मराठीच्या आणि शिवरायांच्या मुद्द्याचे गाजर नाचविण्यात येत आहे. बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती हि मराठी भाषिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. एरव्ही समितीच्या नावाने बोंब मारणाऱ्या राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना निवडणुकीसाठी समितीच्या विचारधारेचीही गरज भासू लागली आहे. भगवा ध्वज, मराठीचा मुद्दा आणि छत्रपती शिवरायांशी निगडित असलेले मुद्दे घेऊन लोकप्रतिनिधींनी राजकीय वातावरण निर्मितीला सुरुवात केली आहे.

सध्या बेळगावमध्ये राजहंसगड विकासकाम आणि याठिकाणी असलेली छत्रपती शिवरायांची सिंहासनारूढ मूर्ती यावरून जोरदार राजकारण तापले आहे. काँग्रेसच्या ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्यात श्रेयवादावरून सुरु असलेल्या टीका-टिप्पण्या यादरम्यान मराठी जनतेचे दैवत आणि अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या बाबत आपल्याला किती तळमळ आहे याचा दिखावा करण्यात येत आहे. बेळगावसह मराठी आणि मराठा समाजातील मतदारांची संख्या अधिक आहे. त्याहून अधिक छत्रपती शिवरायांना दैवत मानणारे युवकही मोठ्या प्रमाणात आहेत. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवरायांचा मुद्दा उचलून धरत या विषयावर राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. बेळगाव दक्षिण, उत्तर, ग्रामीण यामध्ये विशेषतः ग्रामीण आणि दक्षिण विधानसभा मतदार संघात मराठा समाजाची मते मिळविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित कार्यक्रम आखले जात आहेत.Rajhuns gadh

गल्लीपासून दिल्ली पर्यंत छत्रपती शिवरायांचा वापर केवळ राजकारणासाठी केला जात आहे. मराठा समाजाला आकर्षित करून मराठा समाजाची मते मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या संधीसाधू राजकारण्यांकडून मराठी वोट बँक काबीज करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. निवडणूक वगळता सीमाभागातील मराठी भाषिक कधीच या राजकारण्यांना आठवत नाहीत. निवडणुकीत मराठी मते लक्षणीय असल्याचे त्यांना चांगलेच माहीत आहे. मात्र सीमाभागातील मराठी भाषिक हे समितीशी निगडित असल्याकारणाने त्यांची मने वळवून, मुद्दा भरकटवला जात आहे.

हिंदुत्व, भगवा ध्वज आणि यावरून तरुणाईला घालण्यात येत असलेली गळ! हे हीन पातळीवरील राजकारण मराठी भाषिकांनी वेळीच ओळखून आपली अस्मिता विकली जाऊ नये याकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे. निवडणुकीनंतर पुन्हा आपल्यावर प्रशासकीय वरवंटा फिरविला जाणार आणि यावेळी पश्चाताप करण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहणार नाही, हि बाब लक्षात घेऊन आपण कुणाचा झेंडा हाती घेऊन आपला पुढील मार्ग निवडायचा आहे हे मराठी भाषिकांनी गांभीर्याने विचारात घेणे आवश्यक आहे. मराठा समाज, मराठी माणूस, मराठी अस्मिता आणि छत्रपती शिवराय हे कोणत्या राजकारणाचे मुद्दे नसून या सर्व आपल्या अस्तित्वाचा गाभा आहेत, हि बाब देखील लक्षात ठेवणे महत्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.