सालाबाद प्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त शहरातील श्रीक्षेत्र दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिर येथे उद्या शनिवार दि. 18 फेब्रुवारी रोजी ‘महाशिवरात्री महोत्सव -2023’ चे आयोजन करण्यात आले आहे.
भव्य अशा या महोत्सवांतर्गत होणाऱ्या विविध कार्यक्रमांची जय्यत तयारी केली जात असून या महोत्सवाचे फेसबुक व युट्युबवर थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे, अशी माहिती श्री कपिलेश्वर मंदिराचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत चव्हाण यांनी दिली.
महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधीने श्री दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराला भेट देऊन तेथील महाशिवरात्रीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी अभिजीत चव्हाण बोलत होते. श्री कपिलेश्वर मंदिरातर्फे शहरवासी यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन महोत्सवाबद्दल माहिती देताना अभिजीत चव्हाण म्हणाले की, आज रात्री ठिक 12 वाजता महाशिवरात्री महोत्सव -2023 ला प्रारंभ होणार आहे.
यावेळी सर्वप्रथम समस्त बेळगावकरांच्यावतीने पहिला अभिषेक श्री कमलेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे केला जाणार आहे त्यानंतर उद्या पहाटे 5 वाजेपर्यंत पंचामृत अभिषेक चालणार आहे. पुढे सकाळी 6 वाजल्यापासून रुद्राभिषेक सुरू राहणार आहे रुद्राभिषेकानंतर दरवर्षीप्रमाणे त्रिकाल पूजनाचे आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर महाशिवरात्री निमित्त उद्या सायंकाळी 6 वाजता महाआरतीचा कार्यक्रम होईल.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करून फुले व पुष्पदलांची सजावट केली जात आहे. श्रावण महिना आणि महाशिवरात्री दिवशी श्री कपिलेश मंदिराच्या अंतर्गत भागात फुलांची लक्षवेधी आरास केली जाते. यंदा देखील वैशिष्ट्यपूर्णरित्या ही आरास करण्यात आली आहे.
या सजावटीची जबाबदारी गेल्या 5 वर्षापासून विनायक पालकर आणि त्यांचे सहकारी समर्थपणे पार पाडत आहेत असे सांगून मंदिरात गेली 27 वर्षे अखंडपणे सुरू असलेला महाशिवरात्रीचा महाप्रसाद रविवारी 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे. महाशिवरात्र उत्सव समितीतर्फे रविवारी दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत मंदिराच्या ठिकाणी महाप्रसादाचे वितरण होणार असून शहरवासीयांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले.
महाशिवरात्रीच्या महाप्रसादासाठी शहरातील भाविकांकडून दिली जाणारी देणगी आणि शिधा स्वीकारण्यासाठी मंदिरा आवारात खास काउंटर उपलब्ध करण्यात आले आहेत. या ठिकाणी रोख रक्कम व शिधा स्वरूपात देणगीचा ओघ अखंड सुरू आहे. विशेष म्हणजे घरबसल्या श्री कमलेश्वर दर्शन व्हावे म्हणून श्री दक्षिणकाशी कमलेश्वर मंदिर हे फेसबुक पेज आणि श्री कपलेश्वर मंदिर बेळगाव हे युट्युब चॅनेल आज रात्रीपासून भाविकांच्या सेवेत रुजू होत आहे.
यावर आज रात्री 12 वाजल्यापासून देवदर्शनासह अभिषेक वगैरे सर्व धार्मिक विधींचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. या चॅनलला देखील सर्व शहरवासीयांसह भक्तांनी सबस्क्राईब व लाईक करून थेट प्रक्षेपणाचा लाभ घ्यावा, असे अभिजीत चव्हाण यांनी शेवटी सांगितले.