यंदाच्या बेळगाव महापौर पदासाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या कांही नगरसेविकांचा हिरमोड झाला असला तरी त्यांना 2026 साली पुन्हा संधी मिळणार आहे. कारण 2026 सालचे महापौर -उपमहापौर पदाचे आरक्षण आधीच जाहीर झाले असून ते अनुक्रमे ‘सामान्य महिला’ आणि ‘अनुसूचित जाती महिला’ असे आरक्षित आहे.
बेळगाव महापालिका सभागृहाच्या 24 व्या कार्यकाळाची महापौर -उपमहापौर निवडणूक 2026 साली होणार आहे. त्या वेळचे महापौर पद सामान्य महिलेसाठी तर उपमहापौर पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. बेळगाव महापालिकेच्या लोकनियुक्त सभागृहाचा कार्यकाळ मार्च 2019 मध्ये संपला.
मात्र 2019 ते 2022 या काळात बेळगावसह राज्यातील सर्व महापालिकांच्या महापौर व उपमहापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे नगरसेवकांना पुढील तीन कार्यकाळांचे आरक्षण आधीच ठाऊक झाले आहे. त्या आरक्षणावर भाजपच्या नगरसेवकांचा डोळा आहे. तसेच त्या आरक्षणानुसार महापौर उपमहापौर होण्यासाठी जे पात्र नगरसेवक आहेत त्यांना आत्तापासून मोर्चेबांधणी करता येणार आहे.
बेळगाव महापालिकेची निवडणूक गेल्या सप्टेंबर 2021 मध्ये झाली. त्याआधी म्हणजे फेब्रुवारी 2021 मध्ये 23 व्या कार्यकाळाचे महापौर -उपमहापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले होते. त्यामुळे त्या आरक्षणानुसारच महापौर -उपमहापौर निवडणूक होणार असा नगरसेवकांचा समज झाला होता.
मात्र महापालिकेने त्याबाबत नगर विकास खात्याकडे स्पष्टीकरण मागितले. त्यावेळी नगर विकास खात्याकडून सप्टेंबर 2019 मध्ये जाहीर झालेल्या 21 व्या कार्यकाळाच्या आरक्षणानुसार महापौर -उपमहापौर निवडणूक घेण्याची सूचना केली गेली.
त्यामुळे त्याच आरक्षणानुसार गेल्या 6 फेब्रुवारीला निवडणूक झाली. या निवडणुकीत महापौर पदासाठी भाजपच्या वाणी जोशी, सारिका पाटील व दिपाली टोपली यादेखील इच्छुक होत्या. परंतु दुर्दैवाने त्यांना महापौर होण्याची संधी मिळाली नाही. आता 24 व्या कार्यकाळात त्यांना ती संधी पुन्हा मिळू शकते.