बेळगाव लाईव्ह : राज्यात बेंगळुरू महानगर परिवहन महामंडळासह, राज्य परिवहन, ईशान्य परिवहन आणि वायव्य परिवहन हे चारही विभाग सध्या तोट्यात आहेत. चारही परिवहन महामंडळाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी परिवहन महामंडळांचे विलिनीकरण केले जाणार आहे. निवृत्त आयएएस अधिकारी एम. आर. श्रीनिवासमूर्ती यांच्या नेतृत्वाखालील परिवहन विकास समितीने आपल्या अहवालात विलिनीकरणाची शिफारस केली आहे.
परिवहन महामंडळाला तोट्यातून बाहेर काढून पुनर्विकास करण्यासाठी निवृत्त आयएएस अधिकारी श्रीनिवासमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने नुकताच आपला अहवाल परिवहन मंडळाला सादर केला आहे. परिवहन महामंडळांचा तोटा कमी करण्यासाठी विनाथांबा थेट बसेसवर ड्रायव्हर-कंडक्टरची नेमणूक करणे परिवहन मंडळाचे भूखंड व्यावसायिक वापरासाठी देणे आदी सूचनांचा अहवालात समावेश आहे.
परिवहन मंडळाकडून नऊ लाख किलोमीटरपेक्षा अधिक धावलेल्या बसेसना भंगारात काढले जाते. या बसेसमध्ये बदल करून त्या पुन्हा वापरल्या जाऊ शकतात. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो, असेही समितीने सुचविले आहे. या सूचनेनुसार वायव्य परिवहन महामंडळाने बीएमटीसीकडून भंगारात काढल्या जाणाऱ्या एक हजार बसेस खरेदीसाठी करार केला आहे.
वायव्य परिवहन मंडळाला तर दरवर्षी ३०० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. २०१५ पासून तिकीट दरवाढ झालेली नाही. मात्र, इंधन दरवाढ झाल्याने तोटा दिवसेंदिवस वाढतच आहे. परिवहन महामंडळाच्या विलिनीकरणामुळे प्रशासकीय व इंधन खर्चात बचत, बसचे योग्य व्यवस्थापन, प्रवाशांची संख्या आणि गरजेनुसार बस उपलब्ध करून देणे आदी शक्य असून तोट्यातून मंडळाला बाहेर काढले जाऊ शकते, असे समितीने म्हटले आहे. परिवहन विकास समितीच्या अहवालाला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंजुरी दिल्यास चारही परिवहन मंडळाचे विलिनीकरण होणार आहे.