Saturday, November 16, 2024

/

‘आबा घुमिव राजकारणाचं’ ये मोसम का जादू है मितवा ….

 belgaum

कर्नाटकात येत्या निवडणुकीचा आविष्कार….चैनीच चैनी चाललेय फार….. इलेक्शन चा मोसम अनेकांना खर्च करायला लावतोय….. गरिबीच्या झळा सोसणाऱ्यांना आनंदी आनंद गडे असाच अनुभव देऊन जातोय. सध्या आमच्या सीमाभागात तरी असेच वातावरण आहे.

निवडणुकीत तिकीट मिळवण्याची स्पर्धा इतकी वाढली आहे की आजकाल खैरातीची बरसात सुरु आहे. बटने लगी खैरात तो घायल हुवा मै म्हणत भारतीय संविधानात सर्वात महत्वाचा घटक म्हणून ओळखला जाणारा मतदार राजा सर्वात जास्त खुशीत आहे. देणाऱ्याचं खाऊया मटण आणि मनाला येईल ते दाबुया बटण असे म्हणत त्याची दुःखाकडून सुखाकडे वाटचाल सुरु आहे.

कोरोनाचा काळ आला. काम धंदे मेले, जशी जवळची माणसं मेली तशीच आर्थिक दुष्काळात कंबरडीही मोडली. कायतर करून संसार सांभाळणाऱ्या गरिबाला जगायची धडपड असह्य करणारी. अशात निवडणूक होणार याची घोषणा म्हणजे विदर्भात येणार येणार पाऊस येणार अशी हाकोटी ऐकायला मिळाल्यावर जसा आनंद होतो तशीच अद्भुत आनंदाची प्रचिती.

आणि स्पर्धेतल्या घोड्यांनी नेमकी हीच परिस्थिती हेरली आहे. म्हणूनच ज्याला जे पाहिजे ते ते सर्व मिळत आहे, वाटले जात आहे. नको म्हणणाऱ्याला तर घरपोच मिळत आहे. त्यातच जत्रांचा मोसम सुरु झालाय. एरव्ही आमच्या जत्रा म्हणजे ब्रेडचा तुकडा, भाताची ढेकळं आणि खाली हडकूटे, मध्ये पाणी व वर तरंगणाऱ्या तिखट भगजाळ तवंगाच्या तिरंगा रस्स्याची ….. मात्र निवडणूक आली आणि या रश्यात चव आली.

सेपरेट मटणाची भाजी मिळू लागली. चार बकरी मारली तर दहा बकऱ्यांचा फेर आणून निभावून नेण्यापेक्षा चाळीस पन्नास बकरी आणि पोटभर मटणाचा काळ आलाय. मग काय एकट्याने नव्हे तर लग्नासारखे सह कुटुंब सह परिवार जाऊन ताव मारायची फक्कड सोय झाली आहे. पूर्वी मटण मिळालंच नाही म्हणून डोळ्यातनं पाणी गळायचं पण आता दुसरीकडे कुठेतरी आग पडेल एवढं मटण आणि ती आग आणखी भडकवणारी दारू मिळाल्याने मतदार राजा खुशीत आहे.

घरातला मिक्सर बाद झाला म्हणून नवऱ्याबरोबर भांडायची गरज नाही. दारात रांगोळी काढली की मिक्सर हजर होऊ लागलाय. चुली गेल्या आणि परिस्थिती बदलली असताना त्या बदललेल्या चुलीवर कुक्कर येऊन बसू लागला आहे. घरात जेवढे संसार तेवढे कुक्कर आणि मिक्सर आले म्हणजे मते वळणार या भीतीने लगेचच प्रतिस्पर्धी उमेदवार त्या कुक्करमध्ये शिजवलेलं नवीन ताट आणि वाटीत खाण्याची सोय करू लागला आहे. समाज उरलच तर ते ठेवण्यासाठी आणखी एक उमेदवाराने हॉट पॉट दिले आहे. पोट खुश तर दिल खुश आणि दिल खुश तर रुबाब मजबूत अशी अवस्था त्या येणाऱ्या निवडणुकीने करून ठेवली आहे.

एवढं सगळं फुकट मिळाल्यावर काम न करता बसून राहणाऱ्यांच्या करमणुकीची सोयही या निवडणुकीनेच केली आहे. क्रिकेट, फ़ुटबाँल, हॉलीबॉल, चेस, कॅरम सारख्या स्पर्धा आपला वेळ घालवण्यासाठी उपयोगाच्या ठरत आहेत. घरात नाहीतर गल्लीच्या कोपऱ्यावर बसून गरिबीशी कबड्डी खेळण्यापेक्षा दादा कि जय आणि अण्णाला रामराम करत आजकाल वेळ चांगला जाऊ लागला आहे. उमेदवारांचे फोटो खिशात ठेऊन फिरायचे झाले तर पेट्रोल मिळते. जास्त गर्दी करायची झाली तर खिशात फोटो सोबत पैशांचे पाकिटही येऊ लागले आहे. मग काय तारीफ करायला जातंय काय असे म्हणत आजकाल सर्वच जोरदार सुरु झालंय .

मोसम मस्ताना निवडणूक असताना असे म्हणत चैनीचा हा मोसम सुरु आहे. पुढचे दोन महिने वाटलेले घ्यायचे आणि मस्तीत राहायचे आहेत. जब कोई बात बिगड जाये तो साथ देने के लिये कोई आई या ना आये……. आज फिर जिनेकी तमन्ना है म्हणत गावो गावी वातावरण छान आहे. लोकप्रतिनिधी कोण होणार, तिकीट कुणाला मिळणार यापेक्षा तिकीट मागणारे आणि स्वतःला लोकप्रिय बनविण्यासाठी गर्दी जमावणारे आणखी वाढूदेत हीच सध्या जनतेची प्रार्थना आहे.

या सदराच्या निमित्ताने आम्ही हीच प्रार्थना मळेकरणी, वाकडेवड्ड, भावेश्वरी, सुळेभावी, चांगळेश्वरी आणि इतर अनेक देव देवतांकडे करीत आहोत. न पडो तोटा मटणाचा…… पडावा पाऊस दारूचा …… मिक्सर कुक्कर सोबत आता फ्रिज आणि वॉशिंग मशिनही यावे घरी….. बदलाव्या फाटक्या कवंदी आणि चादरी…… हीच कामना मनोमनी…… इच्छूक वाढावे प्रत्येक मतदार संघात आणि मिळावी भरघोस खैरात ……. व्हय गा स्वामी …….. !

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.