Tuesday, December 24, 2024

/

जारकीहोळी सीडी प्रकरणाचे राजकारण तापणार!

 belgaum

बेळगाव लाईव्ह एक्सक्लुझिव्ह : माजी मंत्री आणि विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांचे कथित अश्लील सीडी प्रकरण चांगलेच गाजले आहे. यावरून कर्नाटकातील राजकीय वर्तुळात जोरदार वादळ आले. मात्र हे प्रकरण केवळ एका सीडीपुरते मर्यादित नसून या सीडी प्रकरणामागे मोठे महाभारत घडल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

एकेकाळी बेळगावच्या विद्यमान ग्रामीण आमदार, रमेश जारकीहोळी आणि डी. के. शिवकुमार हे एकाच गटातील राजकीय नेते होते. मात्र अचानक या त्रिकुटामध्ये असे काही घडले कि ज्याचा परिणाम थेट कर्नाटकाच्या सत्तेवर दिसून आला. काँग्रेस-जेडीएस युती सरकार कोसळले. एकाच गटातील नेत्यांमध्ये राजकीय वैरत्व दिसायला सुरुवात झाली. हे घमासान मंत्रिपदावरून झाल्याचे उघड झाले. आणि यामध्ये प्रामुख्याने विद्यमान ग्रामीण आमदार कारणीभूत असल्याचेही उजेडात आले. रमेश जारकीहोळी यांच्यामुळेच आमदार म्हणून निवडून आलेल्या विद्यमान ग्रामीण आमदारांनी रमेश जारकीहोळी यांना डावलून दिल्ली दरबारी मंत्रिपदासाठी गाऱ्हाणे घातले. रमेश जारकीहोळी यांना मंत्रिपद न देता आपल्याला बेळगाव जिल्ह्यासाठी मंत्रिपद देण्याची मागणी त्यांनी केली.

आमदार झालेल्या दुसऱ्याच दिवशी रमेश जारकीहोळी यांना बाजूला सारून थेट दिल्लीला पोहोचलेल्या ग्रामीण आमदारांचा हा सावळा गोंधळ रमेश जारकीहोळींच्या निदर्शनात आला. आणि दिल्लीहून बेंगळुरू विमानतळावर दाखल झालेल्या ग्रामीण आमदारांना रमेश जारकीहोळींनी तिथेच जाब विचारला. महांतेश कवटगीमठ त्यांच्यासमोरच उभयतांमध्ये जुंपली. हा प्रकार नंतर पीएलडी बँकेच्या निवडणुकीदरम्यान जगासमोर उघडकीस आला.

तत्कालीन सरकारमध्ये मंत्रीपदी विराजमान असलेल्या रमेश जारकीहोळी यांची कोंडी ग्रामीण आमदारांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याची तक्रार करत जारकीहोळी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत रामराम ठोकला. ग्रामीण आमदार आणि डी. के. शिवकुमार यांचे निकटचे संबंध असल्याने ग्रामीण आमदारांच्या सांगण्यावरूनच आपल्याला अशी वागणूक दिल्याचा ठपका ठेवत डी. के. शिवकुमार यांच्याशीही राजकीय वैरत्व पत्करत, मंत्रिपद आणि पक्षाला रामराम ठोकत युती सरकार पाडवण्यात रमेश जारकीहोळी कारणीभूत ठरले.

Satish vs dks
File pic… Ramesh jarkiholi and dk shivkumar

हे सर्व राजकीय घमासान सुरु असतानाच रमेश जारकीहोळी सीडी प्रकरण उजेडात आले. आणि या सीडी प्रकरणामागेही डी. के. शिवकुमार यांचा हात असल्याचा आरोप सध्या रमेश जारकीहोळी करत आहेत. आपल्या बदनामीचे षडयंत्र रचण्यासाठी ४० कोटी रुपये खर्चण्यात आले असून या सर्व दरम्यान घडलेल्या गोष्टींची ऑडिओ क्लिप आपल्याकडे असल्याचा दावा रमेश जारकीहोळी यांनी केला आहे. शिवाय सीडी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान कर्नाटकात विधानसभा निवडणूक जवळ येत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा सीडी प्रकरणाचे राजकारण जोरदार सुरु झाले असून या प्रकरणी राजकीय सूत्रांकडून महत्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. घडलेल्या साऱ्या प्रकारानंतर ज्या अर्थी विरोधकांनी ४० कोटी रुपये खर्च केले त्यांनाच आता धूळ चारण्यासाठी १०० कोटी रुपये रमेश जारकीहोळी खर्च करण्याच्या तयारीत आहेत अशीही चर्चा आहे .

रमेश जारकीहोळींकडे या प्रकरणातील १२८ ऑडिओ क्लिप्सचे पुरावे असून हे सर्व पुरावे त्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे सादर केले अशी ही चर्चा आहे . या ऑडिओ क्लिप्स वायरल करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनीही हिरवा कंदील दाखवला असून सध्या रमेश जारकीहोळी दिल्ली फेऱ्या करत आहेत असेही माहिती मिळत आहे. इतकेच काय तर दिल्ली येथे भाजप हायकमांड नव्हे तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी ते गेले असल्याची शक्यता राजकीय सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत बेळगावमधील चार मतदार संघांपैकी ग्रामीण मतदार संघात अधिक चुरस पाहायला मिळणार हे प्रत्येकाला जाणवत होते. मात्र रमेश जारकीहोळी यांनी ग्रामीण मतदार संघच का निवडला? एका मोठ्या आणि जबाबदार पदावर कार्यरत असणाऱ्या नेत्याला ग्रामीण मधूनच उमेदवार उभं करण्याचा विचार का आला? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता लवकरच जनतेला मिळणार आहेत.

याचबरोबर सीडी प्रकरणाची गुंतागुंत देखील सुटत जाऊन पुढे याच सीडी प्रकरणावरून मोठे राजकीय घमासान घडण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.