बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील मध्यवर्ती रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यात आला असून नव्या रेल्वे स्थानकावर विविध वीर पुरुषांच्या प्रतिमा स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र या ठिकाणी छत्रपती शिवरायांची मूर्ती प्रतिष्ठापना करण्याकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी केला असून नूतनीकरण करण्यात आलेल्या रेल्वेस्थानकाच्या उदघाटन करण्यापूर्वी याठिकाणी छत्रपती शिवरायांची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
मध्यवर्ती रेल्वे स्थानक हे छावणी परिषदेच्या अखत्यारीत येते. याच अखत्यारीत मराठा लाईट इन्फन्ट्री कार्यरत आहे. मराठा लाईट इन्फन्ट्री छत्रपती शिवरायांचे आचार-विचार बाळगते. याच माध्यमातून देशासाठी अनेक सैन्य तयार होतात. अनेक कमांडो मराठा लाईट इनफंट्री मधूनच तयार झाले आहेत. ज्याज्यावेळी देशावर संकट आले त्यात्यावेळी मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या सैनिकांनी इतिहास गाजविला आहे.
मराठा सेंटरचे युद्ध घोषवाक्य छत्रपती शिवाजी महाराज की जय असेच आहे ज्या छावणी परिषदेच्या अखत्यारीत रेल्वे स्थानक उभे आहे त्यांनाही छत्रपती शिवरायांचा विसर पडावा, हि बाब दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया रमाकांत कोंडुस्कर यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, रेल्वे स्थानकावर सर्व वीर पुरुषांच्या प्रतिमा स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र छत्रपती शिवरायांची मूर्ती प्रतिष्ठापना करणे जाणीवपूर्वक टाळण्यात आले आहे. हि बाब सरकारच्या निदर्शनात आणून देण्याची गरज नाही. मात्र हि बाब सरकारला निवेदनाच्या माध्यमातून निदर्शनात आणून द्यावी लागत आहे, हि बाब दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. रेल्वेस्थानकाच्या उद्घाटन समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगावमध्ये दाखल होत असल्याची माहिती उपलब्ध झाली असून पंत्रप्रधानांनी यात जाणीवपूर्वक लक्ष घालून शिवरायांची मूर्ती स्थापन करूनच रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करावे, अशी मागणी त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून रेल्वे विभागाकडे केली आहे.
दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाचे प्रिन्सिपल चीफ कमर्शिअल मॅनेजर ए. एस. राव यांच्याकडे सदर मागणीची प्रत सादर करण्यात आली असून लवकरात लवकर रेल्वे स्थानकावर शिवरायांची मूर्ती स्थापन करण्याची विनंती करण्यात आली आहे. यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, वारकरी मंडळी आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते उपस्थित होते.