बेळगाव लाईव्ह : गरिबांचे महाबळेश्वर असणाऱ्या बेळगावची हुडहुडी आता कमी झाली असून गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या झळा वाढत चालल्या आहेत. साधारण नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान मोठ्या प्रमाणात थंडी असणाऱ्या बेळगावमध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाचा चटका बसण्यास सुरुवात झाली आहे. उबदार कपड्यांना पुन्हा तिजोरीत बंद करून आता प्रत्येक ठिकाणी पंखे, एसी कामावर रुजू झाले आहेत!
सकाळच्या सत्रातच उन्हाची तीव्रता जाणवत असून दुपारी कडक ऊन सोसावे लागत आहे. उन्हाळ्यासाठी कोल्ड्रिंक-आईस्क्रीम पार्लर, ठिकठिकाणी रस्त्यावर शीतपेये विक्री करणारे विक्रेते यांची संख्याही वाढत चालली असून रस्त्याशेजारी उन्हाळ्यात येणाऱ्या फळांची आवकही मोठ्या प्रमाणात झाली आहे.
उन्हाळ्यात सर्वाधिक उत्पादन घेतल्या जाणाऱ्या कलिंगडाची आवकही मोठ्या प्रमाणात झाली असून ठिकठिकाणी रस्त्यावर विक्रेत्यांनी कलिंगड विक्रीसाठी ठेवले आहेत. याचबरोबर द्राक्षे, उसाचा रस, शहाळे, ज्यूस विक्रेत्यांनीही दुकाने थाटली आहेत. उन्हाळ्यात आल्हाददायी वाटणाऱ्या या सर्व गोष्टी नागरिक खरेदी करताना दिसत आहेत.
टिळकवाडी ते मच्छे परिसर, पिरनवाडी क्रॉस, नेहरूनगर, सिव्हिल हॉस्पिटल रोड, केएलई बायपास, सदाशिव नगर, सांबरा-बसवणकुडची-कणबर्गी आदी मार्गावर ठिकठिकाणी या विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत.
गेल्या आठवड्याभरात उन्हाच्या झळा वाढल्या असून गेल्या दोन दिवसांपासून अधिक तीव्रतेने ऊन जाणवत आहे. मार्च महिना अखेर दहावीच्या वगळता पहिली ते नववी पर्यंतच्या वार्षिक परीक्षा संपणार आहेत. त्यामुळे आतापासूनच उन्हाळी सुट्टीचे प्लॅनिंग देखील सुरु झाले आहे.
अनेक संस्थांनी ‘समर कॅम्प’ची तयारी सुरु केली असून यंदाच्या मौसमात आतापासूनच बेळगावकर उन्हाळाच्या झळांमुळे हैराण होत आहेत. साधारण रथसप्तमी ते महाशिवरात्रीच्या दरम्यान उन्हाचा प्रभाव अधिक वाढतो असे मानले जाते. आणि याचाच प्रत्यय सध्या प्रत्येकाला येत आहे.