आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने राज्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिकवर निर्बंध घातल्याचा आदेश जारी केला असून त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.
प्लास्टिकचा अतिवापर धोकादायक ठरत असून आरोग्यावरही त्याचे परिणाम होऊ शकतात. प्लास्टिकमुळे पर्यावरण प्रदूषणाचा धोका असल्यामुळे आरोग्य व कुटुंब कल्याण खात्यातर्फे याबाबत महत्त्वाचा निर्णय जारी करण्यात आला आहे.
जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्या हितासाठी सर्व आरोग्य केंद्रांमध्ये एकल वापर होणाऱ्या प्लास्टिकवर निर्बंध घालण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. सामाजिक हित व चांगल्या भविष्यासाठी प्लास्टिकचा अतिवापर टाळणे उचित ठरणार असून आरोग्य केंद्रातून प्लास्टिक हद्दपार करावा अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच तात्काळ त्याची काटेकोरपणे कार्यवाही केली जात आहे. आरोग्य केंद्र एकल प्लास्टिक वापर मुक्त परिसर असल्याची घोषणा करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर प्लास्टिक बाटली, कव्हर, बॅगसह विविध प्लास्टिकच्या वस्तूंची आवर्जून तपासणी करावी. कॅन्टीन किंवा इतर दुकानातून एकल प्लास्टिक वस्तू देणे किंवा पुरवठा न करण्यासाठी सूचना केली जावी. त्याशिवाय निर्बंध घातले जावेत असे आरोग्य विभागानेही कळविले आहे.