Monday, December 23, 2024

/

दलित संघर्ष समितीचे रेल्वे स्थानकासमोर उग्र आंदोलन

 belgaum

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बेळगाव दौरा उद्यावर येऊन ठेपला असताना जिल्ह्यातील दलित संघर्ष समिती (भीमवादी) आक्रमक झाली असून त्यांनी नूतन बेळगाव रेल्वे स्थानकासमोर तात्काळ छ. शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्प बसवावीत, या मागणीसाठी आज रविवारी उग्र आंदोलन छेडले. तसेच शिवछत्रपती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्प अडगळीत टाकणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

कोट्यावधी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आलेल्या बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दर्शनीय ठिकाणी कित्तूर राणी चन्नम्मा वीर, संगोळ्ळी रायण्णा वगैरेंची शिल्पे लावण्यात आली आहेत. मात्र त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना डावलण्यात आले आहे. नूतनीकरण केलेल्या बेळगाव रेल्वे स्थानकाचे उद्घाटन उद्या पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

मात्र तत्पूर्वीच आज रविवारी सकाळी जिल्ह्यातील दलित संघर्ष समितीच्या (भीमवादी) असंख्य कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकाच्या दर्शनीय भागावर तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्प बसवावीत या मागणीसाठी रेल्वे स्थानकासमोर उग्र आंदोलन केले. तत्पूर्वी दलित कार्यकर्त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरून त्यांना रेल्वे स्थानकाच्या गोदामात ठेवलेले शिवछत्रपतींसह डॉ. आंबेडकरांचे शिल्प बाहेर काढावयास लावले. त्यानंतर ही दोन्ही शिल्प रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर ठेवून तीव्र आंदोलन छेडण्यात आले. यावेळी स्थानिक खासदारांसह राज्य सरकार आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात येत होत्या. शिवरायांचे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे शिल्प तात्काळ बसविण्याच्या मागणी बरोबरच ही दोन्ही शिल्प गोदामात अडगळीत टाकणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत दलित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीने रेल्वे स्थानक परिसर दणाणून सोडला होता.Protest railway station

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दलित संघर्ष समिती (भीमवादी) तालुकाध्यक्ष संतोष कांबळे यांने रेल्वे अधिकाऱ्यांनी छ. शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महानायकांची शिल्प अडगळीत टाकून त्यांचा अपमान केला आहे. तेंव्हा त्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई केली जावी अशी मागणी केली.

जोपर्यंत ही कारवाई होत नाही तसेच सदर दोन्ही शिल्प रेल्वे स्थानकाच्या दर्शनीय भागावर बसवली जात नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. दोन्ही शिल्प आजच्या आज तात्काळ बसवली जावीत अन्यथा उद्या बेळगाव दौऱ्यावर येणाऱ्या पंतप्रधानांसमोर काळ्याफिती बांधून निषेध नोंदविला जाईल, असेही त्याने स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.