बेळगाव लाईव्ह : संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आग्रही भूमिका बजावलेले महाराष्ट्रातील नेते छगन भुजबळ यांनीही आज मुंबई येथील आझाद मैदानावरील सीमावासीयांच्या धरणे आंदोलनात सहभाग नोंदविला. यावेळी बोलताना त्यांनी, गेली 66 वर्षे सुरू असलेला सीमालढा हा गिनीज बुक मध्ये नोंद करण्यासारखा असल्याचे म्हटले.
यावेळी १९८६ सालच्या त्यांच्या बेळगाव भेटीच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. १९८६ साली आपण बेळगावला गेलो यावेळी देखील पोलिसांची दडपशाही आपल्याला झेलावी लागली. लाठ्या- काठ्या यासह कारागृहाची शिक्षाही भोगली. शिवसेनेचंआंदोलन झालं. 69 जणांनी हौतात्म्या पत्करलं. मात्र, अजूनही सीमाभागात परिस्थिती जैसे थेच आहे! याचं आपल्याला दुःख आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
१ नोव्हेंबर रोजी काळ्या दिनी होणाऱ्या आंदोलनात आपण नेहमी उपस्थित राहत होतो. मात्र, इतकी वर्षे सीमाभागातील मराठी बांधव कर्नाटकाचे अन्याय आणि अत्याचार सहन करत आहे. यावर आपण मात्र भाषण करण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नाही, याची आपल्याला खंत वाटत असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्र नेहमीच सीमावासीयांच्या पाठीशी उभा राहिला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ते शरद पवार यांच्यापर्यंत अनेक दिग्गज नेते मंडळींनी सीमा प्रश्नी सक्रियपणे भूमिका पार पाडली. आजवर सीमाभागात प्रत्येक आंदोलन दडपण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकार करत आले आहे. कन्नड सक्ती, मराठी शाळांवरील वक्रदृष्टी अशा पातळीवर कर्नाटक सरकार मराठी माणसाला त्रास देत आहे.
मात्र, महाराष्ट्रातील सरकारने महाराष्ट्रात असलेल्या कन्नड शाळा सुरूच ठेवलेल्या आहेत. सध्या महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्नी कोणती भूमिका घेणार? याबाबत आपण सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार असल्याचे भुजबळ म्हणाले.
सोमवारी बेळगाव मध्ये झालेल्या पंतप्रधानांच्या दौऱ्यासंदर्भात देखील त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी पंतप्रधानांनी केलेल्या कन्नड भाषणावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. सीमाप्रश्नी अलीकडेच गृहमंत्र्यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावून सीमाप्रश्न निकाली लागेपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याची सूचना केली. मात्र, कर्नाटक सरकारने याकडेही कानाडोळा केला असून, अजूनही मराठी भाषिकांवर अन्याय सुरूच ठेवले आहेत. याबाबत महाराष्ट्र सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचे ते म्हणाले.