कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला असून या अर्थसंकल्पात उत्तर कर्नाटकला डावलण्यात आल्यामुळे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. बेळगावसाठी तर कोणतीही तरतूद न करता ‘बाबाजी का ठुल्लू’ दाखविण्यात आला आहे, अशी टीका केली जात आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात बेळगावसाठी कोणतीच तरतूद करण्यात आलेले नाही. बेळगावच्या विकासासाठी उत्तर कर्नाटकातील मठाधीश यांनी अनेक प्रस्ताव व मागण्या मांडल्या होत्या त्याची दखल घेण्यात आलेली नाही. स्वतः मुख्यमंत्री बोम्मई उत्तर कर्नाटकचे असताना त्यांनी बेळगावसाठी काहीही केलेले नाही. असे सांगून हा बकवास -बंडल अर्थसंकल्प आहे अशा शब्दात एका ज्येष्ठ पत्रकाराने अर्थसंकल्पावर टीका केली.
निवडणुकीपूर्वी जसा जाहीरनामा काढला जातो तसा हा अर्थसंकल्प म्हणजे राज्यातील भाजप सरकारचा जाहीरनामा आहे. मात्र या अर्थसंकल्पाने बेळगावला काहीच न देता ‘बाबाजी का ठुल्लू’ दाखविला आहे. हा अर्थसंकल्प बेळगावसाठी निराशाजनक आहे दरवेळी प्रमाणे यावेळी देखील उत्तर कर्नाटकावर अन्याय झाला आहे असे सांगून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे दुसऱ्याच्या हातचे बाहुले बनल्यामुळे हे सरकार व्यवस्थित कार्य करत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्य अर्थसंकल्पात बेळगावसाठी काय आहे? हे जाणून घ्यायचे झाल्यास कळसा -भांडुरा नाला थिरूवू योजनेच्या अंमलबजावणीसाठी 1000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बेळगाव -कित्तूर -धारवाड रेल्वे मार्ग प्रकल्पच्या भूसंपादनासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कर्नाटक राज्य लघु उद्योग विकास महामंडळातर्फे राज्यात 9 ठिकाणी नवे औद्योगिक क्लस्टर स्थापन केले जाणार आहेत. या ठिकाणांमध्ये कारवार जिल्ह्यातील कोडकनी, बेळगाव जिल्ह्यातील कणगला, चामराजनगर मधील बंदनागुप्पी, कलबुर्गी येथील चित्तापुरा, तुमकुर जिल्ह्यातील बायरागोंदनहळ्ळी – चिक्कनायकनहळ्ळी, बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद, रायचूर ग्रामीण, विजयपूरा मधील हुवीनहिप्परगी आणि चित्रदुर्ग जिल्ह्यातील मोलकलमुरू यांचा समावेश आहे. विभिन्न कल्याण आणि सामाजिक सुरक्षा उपयांतर्गत 23 लाख लाभार्थींना एकूण 1785 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये 3.8 लाख मुलांना विद्यानिधी योजनेअंतर्गत दिलेली 543 कोटी रुपयांची सवलत, 2 लाख मजुरांना मोफत बस पास सुविधा, त्यांच्या 16400 मुलांना शैक्षणिक साहित्याचे वितरण, कर्नाटक इमारत बांधकाम आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून बेंगलोर ग्रामीण, शिमोगा, बेळगाव आणि चामराजनगर जिल्ह्यात हंगामी निवास व्यवस्था यांचाही समावेश आहे. युवा पिढीला क्रीडा क्षेत्रात प्रवीण करण्यासाठी मनरेगा योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सरकारकडून 5 कोटी रुपये खर्चाच्या क्रीडा केंद्राची उभारणी.