बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र कर्नाटक-सीमाप्रश्नी बुधवारी होणारीही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून या खटल्यात काम पाहणारे त्रिसदस्यीय खंडपीठातील कर्नाटकचे न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न यांनी माघार घेतली आहे.
सीमाप्रश्नी सुनावणी अंतिम टप्प्यात असताना वारंवार लांबणीवर पडत असलेल्या सुनावणीमुळे सीमावासीयातून नाराजी व्यक्त होत आहे. तारीख पे तारीख अशा पद्धतीने सुरु असलेल्या कामकाजामुळे पुन्हा सीमाप्रश्नी भिजत घोंगडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी झालेल्या २ ते ३ सुनावणीदरम्यान कर्नाटकाच्या न्यायाधीशांचीच त्रिसदस्यीय खंडपीठात नियुक्ती करण्यात आली होती. यादरम्यान यापूर्वीदेखील वारंवार सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आज होणाऱ्या सुनावणीदरम्यान कर्नाटकचे न्यायाधीश काम पाहणार होते. मात्र त्यांनी सीमाप्रश्नी सुनावणी करण्यास नकार दर्शविल्याने पुन्हा सदर सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणीची तारीख अनिश्चित असून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुनावणी कधी होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाला सुनावणी करण्याचा अधिकार नसल्याचा दावा कर्नाटक सरकारने केला होता. कर्नाटक सरकारच्या या अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता होती. मात्र आजही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी न झाल्याने पुन्हा सीमावासियांच्या नजरा पुढील सुनावणीकडे आवासून पाहत आहेत.