Friday, December 20, 2024

/

आबा घुमिव राजकारणचं- वाचवा आमचे खोके, सीमाभाग एकदम ओके

 belgaum

ज्या शिवसेनेच्या जोरावर महाराष्ट्रात आगमन केले त्या भाजपने अखेर शिवसेना संपविली. एकनाथ शिंदे यांना फोडले आणि मुख्यमंत्री केले…. आता चाळीस खोके एकदम ओके हे वाक्य महाराष्ट्रात ओठा ओठांवर आले. सीमाभागात समिती संपविण्याचा डाव एक पक्ष म्हणून भाजप आखत आहे हे वास्तव आहे.

सीमाभाग अस्तित्वाचे जे स्वतःला हकदार मानतात अशांनी या भाजपच्या गळाला लागू नये ही सामाजिक गरज आहे. पण अनेक अडचणींनी ग्रासलेल्या लोकांना शरणागती पत्करायला लावणे हा भाजपचा स्थायीभाव आहे. इडीची भीती दाखविली आणि शिंदे भलीमोठी बगावत करायला तयार झाले असे महाराष्ट्रात सर्वत्र बोलले जाते. तसेच सीमाभागात ज्यांना इडीची भीती आहे त्यांनी आत्ता वाचवा आमचे खोके म्हणत भाजप नेत्यांसमोर सपशेल लोटांगण घालण्यास सुरुवात केली आहे अशी चर्चा सीमाभागात जोरात सुरू आहे. वाचवा आमचे खोके तुमच्यासाठी आम्ही ठेवतो सीमाभागातील सर्व मतदारसंघ ओके असेच तर आमचे नेते सांगून आले नसतील ना? असा प्रश्न सद्या सीमाभागात विचारला जात आहे.

याला कारणही आहे.पुण्यात सकाळ माध्यमसमूह आयोजित सहकार महापरिषद झाली. या महा परिषदेचे आयोजक होते सीमाभागात सकाळ चे मोठे प्रतिस्पर्धी असणाऱ्या तरुण भारत चे संपादक किरण ठाकूर. हे आयोजन झालं किरण ठाकूर यांच्या लोकमान्य या संस्थेकडून. व्यासपीठावर होते भाजप चे इडी विभाग प्रमुख केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. महाराष्ट्रातील इडी चे प्रमुख विस्तारक आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इडीच्या भीतीने मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे. या समारोपाच्या कार्यक्रमात किरण ठाकूर यांनी अमित शहा यांचा सत्कार केला. हा विषय इथेच सुरू होतोय. कर्नाटकात निवडणुका येत असताना, सीमाभागात काटेकी टक्कर करून समितीचे अस्तित्व जपण्याची वेळ आलेली असताना सीमाभागाचे लाडके मामा स्वतःच्या अस्तित्वासाठी संपूर्ण सीमाभागातील जनतेचा पोपट करत नाहीत ना? असा संशय निर्माण करणारा हा विषय आहे.Mes politics vidhansabha

मामा अडचणीत आले की सगळा सीमाभाग पेटून उठतो. त्यांनी स्थापन केलेल्या आणि प्रचंड विस्तार केलेल्या लोकमान्य सोसायटीला नख लावण्याचा प्रयत्न झाला की घरा घरात आणि मना मनात राग येतो. लोकमान्य चे अस्तित्व जपले जावे तर मामांनी आपली सीमाभागातील ताकत भाजपला दाखवून देऊन असे जनतेचे प्रामाणिक मत आहे.

पण सीमाभागात उमेदवार कोण द्यायचा यापासून समितीचे नियोजनही अद्याप झालेले नसताना मामा भल्या मोठ्या व्यासपीठावर भाजप नेत्यांचे सत्कार करत सुटले तर सीमाभागाने काय संदेश घ्यायचा? लोकमान्य वाचविण्यासाठी त्यांनी शरणागती पत्करली म्हणायची की आता आमच्या भागात निवांत आमदार निवडून आणा आम्ही फूट निर्माण करून एकदम ओक्के करायला सज्ज आहोत…. तुम्ही वाचवा आमचे खोके असे सांगून मोकळे झाले असा अर्थ काढायचा?
किरण ठाकूर मामा यांचे हे बदलते समीकरण येत्या निवडणुकीत समितीला मारक ठरणारे आहे. यासाठी आता सर्वच लहान मंडळींना मोठा घास घेऊन त्यांना सूचना नव्हे तर विनंती करण्याची वेळ आली आहे. मामा म्हणजे शान आणि सीमाभागाचा अभिमान ही ओळख मागच्या निवडणुकीत काही निर्णयांनी पुसली गेली. मागच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवात फक्त मामा जबाबदार असे म्हणता येत नसले तरी त्यानंतरचे त्यांचे राजकारण त्यांना आता पराभवात सुख मिळत आहे असेच दाखवणारे आहे हे नाकारता येत नाही. असेच झाले तर येत्या निवडणुकीत पुन्हा समितीच्या विजयाला नख लावले जाणार आणि हे नख कालांतराने स्वतः मामा यांनाही धोक्याचे ठरणार हे आत्ताच सांगितले तर चुकीचे ठरणार नाही.
भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. राजकारण करताना कुठल्याही थराला जाऊन हा पक्ष आपले अस्तित्व वाढवतो. सीमाभागात सर्व मतदारसंघांवर आपले वर्चस्व निर्माण करणे हे या पक्षाचे ध्येय आहे. यात मामा यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींची पडती बाजू भाजपला जमेची ठरू नये ही गरज आहे.
लोकमान्य जपली जावी, जगावी आणि आणखी वाढावी तसेच समिती सीमाप्रश्न सुटेतोवर टिकावी हे ध्येय असणे गरजेचे आहे. सहकार राजकीय बळकटी साठी वापरला जायला हवा. हाच सहकार कमकुवत बाजू वाचण्यासाठी वापरला गेला तर त्यावर आधारित व्यक्ती आणि समाज धोक्यात येतो. यासाठी आता मामांनी आपले खोके वाचविण्यासाठी सीमाभागाची ताकत पणाला लावणे योग्य नव्हे….
सद्यातरी तसे दिसत आहे. हे बदलले नाही तर अस्तित्व गमावलेल्या सीमावासीय जनतेचे नेते असे त्यांनाच म्हणून घ्यावे लागेल….. सीमाभाग आणि समितीला संपविण्यासाठी भाजपला सीमाभागातील एकनाथ शिंदेंची गरज आहे. त्याची उपलब्धि करून द्यायची की नाही हे आता शिंदेंच्या पावलावर पाऊल टाकलेल्यांनी ठरवायचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.