बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगावच्या रहदारीची समस्या अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकीकडे अशास्त्रीय पद्धतीने घालण्यात आलेले गतिरोधक, रहदारी यंत्रणेवर नसलेला रहदारी विभागाचा अंकुश आणि बेळगावमधील काही बेजबाबदार नागरिक आणि यात प्रामुख्याने भर टाकणारी तरुणाई! शहरातील प्रमुख रस्त्यांवरून सुसाट वेगाने दुचाकी चालविण्याची तरुणांमध्ये जणू स्पर्धाच दिसून येत आहे. सध्या बाजारात ३०० सीसीच्या वर असणाऱ्या महागड्या दुचाकींची क्रेझ आहे. हौसेखातर अनेक तरुण अशी वाहने घेतात. कर्णकर्कश्श आवाजाचे हॉर्न, फटफट्या गाड्यांचे ‘मॉडिफाइड सायलेन्सर’ आणि सायलेन्सरचा आवाज करत गल्लीबोळातून जोरजोरात चालवल्या जाणाऱ्या वाहनांचे आवाज आणि यापलीकडे असणारा वेग यामुळे आपल्या जीवाशी खेळ करणाऱ्या बेजबाबदार तरुणांमुळे इतरांच्या जिवाशीही खेळ केला जात आहे.
अनेक चित्रपटातील नायक दुचाकीवर स्वार होतात. पण दुचाकीपेक्षाही ते वेगावर आरूढ झालेले पाहायला मिळतात. याचेच अनुकरण करुन अनेक तरुण धोकादायक पद्धतीने रस्त्यावर वाहने चालवताना दिसतात. चित्रपटात दाखविल्या जाणाऱ्या गोष्टींमुळे तरुणाईला आणखीन चेव चढला असून वेगासोबतच वेडीवाकडी वाहने चालविणे हि तरुणांची ‘फॅशन’ झाली आहे. तरुणांना लागलेले वेगाचे वेड नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून रस्त्यावरून आधीच जीव मुठीत धरून चालणाऱ्या नागरिकांना वेगवान दुचाकीस्वारामुळे आणखीनच दहशतीत राहावे लागत आहे.
‘बेळगाव लाईव्ह’ वर नुकताच गतिरोधकांसंदर्भात एक विशेष लेख प्रकाशित करण्यात आला होता. बेळगाव मध्ये अनेक ठिकाणी अशास्त्रीय पद्धतीने गतिरोधक निर्माण करण्यात आले आहेत. अतिवेगाने चालविल्या जाणाऱ्या दुचाकी या गतिरोधकावरून गेल्या तर याचे विपरीत परिणाम देखील भोगावे लागत आहेत. गतिरोधकावरून अतिवेगाने गेलेली वाहने आणि त्यावर स्वार असणारे चालक फरफटत जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशा अनेक अपघातांमधून तरुणांना जीव गमवावे लागले आहेत. यामध्ये दुचाकीस्वारांसहित पादचाऱ्यांनाही जीव धोक्यात घालण्याची वेळ निर्माण झाली आहे. अशा बेजाबदार तरुणाईमुळे पालकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. बेजबाबदार वृत्तीमुळे हाताशी आलेल्या मुलांना पालकांना खांद्यावरून घेऊन जाण्याचे दुर्दैव समोर येत आहे.
अलीकडे सर्रास शालेय विद्यार्थ्यांकडेही दुचाकी देण्याचे प्रकार वाढले आहेत. वाहतूक नियमानुसार १८ वर्षे वयोगटातील मुलांनाच दुचाकी चालविणे अनिवार्य आहे. शिवाय यासाठी वाहन परवाना असणेही आवश्यक आहे. मात्र कॅम्प मधील काही भागातील शालेय विद्यार्थ्यांकडे दुचाकी असल्याचे दिसून येत आहे. वाहतुकीचे नियम डावलून पालकांनीही मुलांना दुचाकी देऊन स्वतः अपघाताच्या तोंडाशी नेऊन ठेवण्याचे प्रकार देखील सुरु आहेत. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुणाईकडून बेफाम वाहन चालविण्यात येत आहे. वेगमर्यादा पाळण्यात न आल्याने आणि वेगवान दुचाकींचा वेग आवरता न आल्याने अनेक अपघात घडलेले निदर्शनात आले आहेत.
या साऱ्या गोष्टींचा सारासार विचार करुन पालकांसह वाहतूक विभाग, शाळा-महाविद्यालयांमधून मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. हेल्मेट सक्तीच्या माध्यमातून नागरिकांच्या सुरक्षेसाठी रहदारी विभागाने पुढाकार घेतला. हेल्मेट सक्तीदरम्यान वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात रहदारी विभागाने तत्परता दाखवली. मात्र , मात्र हेल्मेट सक्ती का? आणि कशासाठी? याबाबाबत जनजागृती करण्यात मात्र रहदारी विभाग कमी पडला. दुचाकिस्वाची बेदरकार वाहन चालविण्याची सवय हि केवळ दुचाकीस्वारांनाच नाही तर इतरांनाही महागात पडत आहे. यामुळे तरुणाईच्या या ‘वेगाच्या वेडाला’ जरब बसवून हा वेग आटोक्यात आणणे काळाची गरज आहे.