येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील गायरान जमिनीमध्ये सरकारकडून क्रीडांगण उभारण्याचा प्रस्ताव असून त्याला समस्त येळ्ळूरवासियांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. गावातील श्री चांगळेश्वरी मंदिरामध्ये रविवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत सदर प्रस्ताव हाणून पाडण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
येळ्ळूर येथील सर्व्हे नं. 1142 मधील 49 एकर 13 गुंठे जागा गायरान म्हणून नोंद आहे. या सर्व्हे नं.मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, मराठी प्राथमिक शाळा, दलित बांधवांची इंदिरा आवास योजना, येळ्ळूरला पाणीपुरवठा करणारी योजना त्याचबरोबर हरी मंदिर वसलेले आहे. या ठिकाणी सरकारने आंतरराष्ट्रीय क्रीडांगणाचा घाट घातला आहे.
सदर क्रीडांगणाला येळ्ळूरवासियांनी तीव्र विरोध केला आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून सरकारचा क्रीडांगणाचा प्रस्ताव हाणून पाडण्याचा निर्धार येळ्ळूर गाव कमिटी व येळ्ळूर ग्रामपंचायतीने बोलाविलेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री चांगळेश्वरी ट्रस्टचे अध्यक्ष नारायण कंग्राळकर हे होते. प्रारंभी येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे चिटणीस प्रकाश अष्टेकर यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. येळ्ळूर ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील यांनी ग्रामपंचायतीमध्ये क्रीडांगण विरोधी ठराव करून देखील आम्हाला पुन्हा नोटीस दिली. परंतु सदर क्रीडांगण आम्ही होऊ देणार नाही असे त्यांनी सांगीतले. विकासाला आमचा विरोध नाही.
एका दृष्टीने विचार केल्यास येळ्ळूर गावामध्ये 25000 लोकसंख्या आहे. यामध्ये जास्तीत जास्त शेतकरीवर्ग आहे. त्यामुळे येळ्ळूर गावच्या 49 एकर 13 गुंठे जागेपैकी 40 एकर गायरान जागा जर आंतरराष्ट्रीय क्रीडांगणासाठी गेली तर याचा फटका संपूर्ण शेतकरी वर्गाला बसणार आहे. असे सांगून याखेरीज ग्रामपंचायतच्या भावी नव्या उपाय योजना आणि विकास कामांच्या पूर्तते करिता आमच्या गावाकडे जागाच शिल्लक राहणार नाही असे सांगून त्याचबरोबर जनावरे चारण्यासाठी गायरान अतिशय महत्त्वाचे आहे असे सतीश पाटील यांनी स्पष्ट केले.
बैठकीमध्ये ग्रा. पं. उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर, दत्ता उघाडे, अशोक कोलकार, दुधाप्पा बागेवाडी, सतीश गणपती पाटील, मनोहर पाटील, मधु कुगजी, क्रीडा शिक्षक नारायण पाटील, पत्रकार मनोहर घाडी व रमेश धामणेकर यांनीही विचार मांडले. सदर बैठकीस येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी, ग्रा. पं. अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर, सदस्य शिवाजी नांदुरकर, प्रमोद पाटील, परशराम परीट, रमेश मेणसे, जोतिबा चौगुले, राकेश परीट, दयानंद उघाडे, ग्रा. पं. सदस्या अनुसया परीट, पार्वती रजपूत, मनीषा घाडी, रूपा पुण्यान्नावर, सुवर्णा बिजगरकर, शालन पाटील, वनिता परीट, सोनाली येळ्ळूरकर, राजू डोण्याणावर, विलास बेडरे, चांगळेश्वरी ट्रस्टचे सेक्रेटरी वाय. सी. इंगळे, माजी ग्रा. पं. सदस्य शिवाजी गोरल, अवचारहट्टीचे लक्ष्मण मेलगे, हणमंत आप्पाण्णा पाटील, भरत मासेकर गावातील आदींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येळ्ळूरमधून रिंग रोड करण्याचा घाट तर सरकारने घातलाच आहे आणि त्यात भर म्हणून हे विकासाच्या नावाने होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडांगणामुळे गावातील पिकाऊ जमीन व गायरान नष्ट होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या पोटावर पाय आणून अशा कोणत्या विकासाला प्राधान्य दिलं जातंय?असा संताप्त सवाल नागरिकांमधून व्यक्त होत आहे.